मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी आता केंद्रीय संस्थेकडून होणार आहे. विमान अपघात तपास ब्युरो या संस्थेने अपघाताची चौकशी सुरू केली असून त्याचा अहवाल आल्यानतंर तो राज्य सरकारलाही पाठवण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या अपघाताची चौकशी करावी असे पत्र केंद्रीय उड्डाण मंत्री किंजरापु राममोहन नायडू यांना लिहिलं होतं. त्यानंतर केंद्रीय मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात ही माहिती दिली.
विमान अपघात तपास ब्युरो यांनी तपास सुरु केला आहे. विमानातील ब्लॅकबॉक्स ताब्यात घेण्यात आला आहे. विमान अपघात आणि घटना नियमांनुसार, तपास सुरु केला आहे. तो पारदर्शी आणि कालबद्ध पद्धतीने होईल.
या अपघातातील सर्व टेक्निकल रेकॉर्डस, ऑपरेशनल तपशील, घटनास्थळावरील तथ्य याचा तपास केला जात आहे. भविष्यात अशा घटना होऊ नयेत, या आपल्या विनंतीची मंत्रालयाने दखल घेतली असून, चौकशी अहवाल येताच त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येतील. या चौकशीत महाराष्ट्र सरकारचेही सहकार्य आम्हाला मौल्यवान असेल. स्थानिक प्रशासनाची यात मदत लागेल. हा संपूर्ण चौकशी अहवाल राज्य सरकारलाही आम्ही देऊ.
