पालिकेच्या जागेच्या बदल्यात फेरीवाल्यांकडून हप्ता वसूली
मुलुंड म्हाडा कॉलनीत फेरीवाल्यांमुळे नागरीक त्रस्त
पालिका अधिका-यांच्या संपत्तीची चौकशीची मागणी
मुंबई: निष्पाप लोकांचा जीव गेल्याशिवाय प्रशासकीय यंत्रणेला जाग येत नाही. हे सर्व श्रुत आहे. भांडुपची दुर्घटना असो वा कुर्ल्यातील मारहाण प्रकरणानंतर फेरीवाल्यांवर युध्द स्तरावर कारवाई करण्यात आली. आता दोन्ही प्रकरण शांत झाल्यानंतर पुन्हा एकदा फेरीवाल्यांनी ठाण मांडायला सुरवात केली आहे. याचा सर्वाधीक त्रास मुलुंडकरांना होत असून केवळ फुटपाथच नव्हे तर रस्त्यांवरही त्यांनी आपले बस्तान मांडुन ठेवले आहे. दिखाऊ पणाची कारवाई करणारी पालिका प्रशासन वारंवार कायदा मोडणा-या फेरावाल्यांवर कायमस्वरुपी कारवाई का करीत नाही असा प्रश्न नागरीक करीत आहेत.
मुलुंड पश्चिम येथील महात्मा गांधी मार्गावरील फेरीवाल्यांच्या अतिक्रमनाबाबत नागरीकांनी केलेल्या तक्रारी नंतर फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. मात्र दुस-याच दिवशी फेरीवाल्यांनी या ठिकाणी अतिक्रमण केले. दिखाऊ पणाची कारवाई करणारे पालिका प्रशासन अशा फेरीवाल्यांवर गुन्हे दाखल का करीत नाहीत. असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. एम.जी. मार्गावर दुकानदार व फेरीवाल्यांनी फुटपाथ अडवून ठेवली आहे तर रस्तांवर बेकायदेशीर पार्किग मुळे पादचा-यांना रस्त्यावरुन चालावे लागते. त्यामुळे स्टेशनकडे येणा-या बेस्ट बसेसमुळे भांडुप सारखी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अत्यंत अरुंद रस्त्यातून बेस्ट बसला मार्गक्रमण करावे लागते. रस्त्याच्या दुतर्फा भागात फेरीवाल्यांनी व बेकायदेशीर पार्किंगवाल्यांनी अतिक्रमण केल्याने नागरीकांना या भागातून चालणे अवघड होऊन गेले आहे. अशीच परिस्थिती मुलुंड पश्चिम येथील रामरतन त्रीवेदी मार्ग, एस.एल.मार्ग या ठिकाणी दिसून येते. मुलुंड पुर्व पश्चिम येथे तर अनेक ठिकाणी ना फेरीवाला क्षेत्र अशी पाटी लावण्यात आली आहे. विनोदाची गोष्ट म्हणजे फेरीवाले याच पाटीखाली आपला ठेला (दुकान) लावतात. त्यांना आता पालिकेच्या कारवाईची भीती राहिली नसून पालिका व फेरीवाल्यांमधील आर्थिक व्यवहारामुळे त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे फेरीवाले व नागरीक सांगतात.
मुलुंड पुर्व येथील म्हाडा कॉलनी रिध्दी सिद्धी इमारती मधील दुकानदारांनी त्यांचे विक्रीचे सामान शटर बाहेर काढल्याने नागरीकांना या ठिकाणी चालता येत नाही. त्यातच फेरीवाल्यांचे अतिक्रमण व बेकायदेशीर पार्किंगमुळे शाळेत जाणा-या लहान मुलांना व पालकांना जीव धोक्यात घालून रस्तांवरुन चालावे लागते. दुकानदारांमुळे बेकायदेशीर पार्किंग ही येथील नागरीकांची डोकेदुखी ठरली असून अशाच पार्किंगमुळे म्हाडा कॉलनीत एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. या भागात मोठ्या प्रमाणावर फेरीवाल्यांकडून हप्ते वसुली केली जात असल्याचे नागरीक उघडपणे बोलतात. अनेकांनी तर पालिकेची जागा फेरीवाल्यांना चालविण्यासाठी दिली असून त्याबदल्यात महिना ठराविक रक्कम त्यांच्याकडून वसूल केली जाते. हा सर्व प्रकार म्हाडा कॉलनीत राजरोसपणे चालतो.  पालिका व पोलीस प्रशासनाच्या नाकाखाली चालणा-या या हप्ते वसुलीवर कारवाई मात्र शुन्य असल्याचे नागरीक सांगतात. चाईनीस, पानीपुरी, नारीयळ पाणी व वडापावच्या फेरीवाल्यांकडून ही हप्ते वसूली केली जात असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे पालिका व फेरीवाल्यांच्या आर्थिक उलाढाली पाहता पालिकेच्या सहाय्यक आयुक्तांपासून ते सर्व वरिष्ठ अधिका-यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी आता नागरीक करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *