आंबा पीक धोक्यात : नुकसान भरपाईसाठी देवगडचे आंबा बागायतदार एकवटले…!
18 फेब्रुवारीला जामसंडे येथे मेळावा…!
देवगड (प्रतिनिधी )– बदलते हवामान हवामान आणि कीड- रोगांचा अनियंत्रित प्रादुर्भाव त्यामुळे यंदा हापूस आंबा पीक धोक्यात आले आहे हे लक्षात घेऊन बागायतदारांना दिलासा मिळेल या दृष्टीने सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावेत यासाठी सर्व आंबा बागायतदार आता एकवटले आहेत.
देवगड येथील आंबा बागायतदार व व्यापारी संघाच्या प्रतिनिधींनी तालुक्यात गावोगावी फिरून या प्रश्नावर बागायतदारांना संघटित केले असून प्रशासनाला याबाबतचे निवेदन दिल्यानंतर आता संघटना पातळीवर एक मेळावा आयोजित केला आहे.
येत्या 18 फेब्रुवारी रोजी जामसंडे येथे सर्व आंबा बागायतदारांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
या मेळाव्याला बागायतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संघाचे अध्यक्ष आनंद उर्फ काका डोके यांनी केले आहे.
ही माहिती डोके यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. यावेळी संघाचे उपाध्यक्ष विनय पाडावे, रविकांत झरकर यांच्यासह अन्य प्रतिनिधी उपस्थित होते.
यंदाच्या आंबा हंगामात बागायतदारांसमोर जे संकट उभे राहिले आहे त्याकडे जिल्हा प्रशासन, जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे तसेच संबंधित महसूल आणि कृषी अधिकारी यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर पंचनामांची प्रक्रिया सुरू झाली असून आम्ही त्याचे स्वागत करतो. मात्र केवळ पंचनामे करून हा प्रश्न सुटणार नाही तर बागायतदारांचे कर्ज माफ करून योग्य नुकसान भरपाई मिळावी यावर आम्ही ठाम आहोत
यंदाच्या हंगामात बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उत्पादनही घटणार आहे. शिवाय कीड- रोगावर नियंत्रण आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्चही करण्यात आला आहे. परिणामी बागायतदारांचे फार मोठे नुकसान होणार आहे आर्थिक संकटात सापडलेल्या बागायतदारांना शासनाने नुकसान भरपाई देण्यासाठी ठोस निर्णय घ्यावा अशी संघाची आग्रही मागणी आहे.
संघटित लढा उभारणार…!
यंदा हापूस वर अस्मानी संकट उडवले आहे त्यासाठी बागायतदारांनी संघटितपणे लढा उभारण्याची गरज आहे. एकत्र न आल्यास ‘आता नाही तर पुन्हा नाही’, अशी स्थिती होईल आणि म्हणूनच सरकारने योग्य आणि सकारात्मक पावले न उचलल्यास बागायतदार तीव्र आंदोलन उभारतील असा इशारा डोके यांनी दिला आहे.
