“सुनेत्रा पवार यांना काम समजून घेऊ द्या, मग काय करायचे ते…”
छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया चर्चेत…

हरिभाऊ लाखे

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या निधनानंतर अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या विलिनीकरणाची दररोज चर्चा सुरु आहे. अखेर शनिवारी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी यापुढे विलिनीकरणाचा विषय आमच्याकडून बंद, असे सांगण्याची वेळ आली. परंतु, त्याच दिवशी नाशिकमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनीही दोन्ही राष्ट्रवदींच्या विलिनीकरणाविषयीच भाष्य केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविषयीही त्यांनी मत व्यक्त केले. त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण आणि सुनेत्रा पवार हे दोन विषय यापुढेही चर्चेत राहणार आहेत.
महायुतीत सत्तेत असलेले राष्ट्रवादीचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्युनंतर अजित पवार गटाची धुरा आता कोणाकडे, असा प्रश्न प्रथम उपस्थित करण्यात येऊ लागला होता. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाशिवाय आता पर्याय नसल्याचा एक विचार पुढे आला. त्याविषयी दोन्ही बाजूकडील एकेका नेत्याच्या दररोज प्रतिक्रिया पुढे येऊ लागल्या. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून अजितदादा विलिनीकरणाविषयी आग्रही होते, असे सांगण्यात येऊ लागले. तर, अजित पवार गटाच्या नेत्यांकडून विलिनीकरणाविषयी अजितदादांनी कोणतीच चर्चा केली नव्हती, असा दावा करण्यात येऊ लागला. त्यामुळे या प्रकरणात नेमकी कोणाची बाजू खरी, हे सामान्य कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना समजेनासे झाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या मुखपत्रात एक लेख लिहिला. त्यात दोन्ही राष्ट्रवादींचे विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाचे नेतृत्व अजितदादांकडेच जाणार होते, असा दावा केला आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतील काही नेत्यांनी, अजित पवार हे स्वत: विलिनीकरणाची अधिकृत घोषणा १२ फेब्रुवारीला करणार होते, असा दावा याआधीच केला होता. दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया दररोज पुढे येत असल्याचे दिसते. विलिनीकरणाच्या चर्चेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनीही उडी घेतली आहे.
नाशिक येथे शनिवारी माध्यमांशी छगन भुजबळ यांनी विलिनीकरणाच्या विषयावर प्रतिक्रिया दिली. रोज विलिनीकरणाची चर्चा का होत आहे, हे आपणास कळत नसल्याचे त्यांनी सांगितले. विलिनीकरण आजही करता येईल. एक महिन्याने, दोन महिन्यांनी करता येईल. त्यासाठी घाई करण्याचे कारण काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विलिनीकरणाच्या विषयावर कोण काय म्हणाले, याविषयी मोघमपणे बोलण्यात काही अर्थ नाही. आता नवीन कॅप्टन त्यासंदर्भात काय ते बघतील. आमदारांची बैठक घेतील. हा म्हणतो, तो म्हणतो म्हणून घाई का करत आहात ? पक्ष संघटना सगळे मिळून तयार होते, पक्ष बनतो. पक्ष म्हणजे बोर्ड आहे का, ऑफिस आहे का, असे प्रश्न उपस्थित करीत भुजबळ यांनी काम करणारे कार्यकर्ते मिळून संघटना, पक्ष तयार होतो. ते सगळे बसून विचार करतील, असे सांगितले.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून नुकताच पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर आता लवकरच आम्ही त्यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करणार आहोत. यानंतर पक्षातील प्रमुख लोक विलीनीकरणाबाबत चर्चा करण्यासाठी ज्या नेत्यांना बोलावतील त्यांच्याशी चर्चा होईल. आता नवीन कॅप्टन आल्या आहेत. त्यांना बसू द्या, काम समजून घेऊ द्या. मग काय करायचे ते बघू, असे मंत्री भुजबळ यांनी नमूद केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *