श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांचे ३५० वे शहिदी समागम शताब्दी वर्ष
महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी प्रभात फेरीच्या माध्यमातून दिला देशभक्तीचा संदेश
ठाणे : ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक २५ तसेच शाळा क्रमांक ५४, पातलीपाडा येथे शीख धर्मातील नववे गुरु आणि ‘हिंद-दी-चादर’ म्हणून ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त प्रभात फेरीचे आयोजन नुकतेच करण्यात आले. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, धर्मनिरपेक्षता, बलिदान आणि मानवतेच्या मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश देण्यात आला.
प्रभात फेरीत शाळा क्र. २५ व ५४ मधील विद्यार्थी, शिक्षकवृंद तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन गुरु तेग बहादूर साहिबजींच्या जीवन कार्याविषयी घोषवाक्ये दिली. त्यांच्या अद्वितीय बलिदानाची आणि धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेल्या योगदानाची माहिती देणारे संदेश परिसरात घुमले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनचरित्राची माहिती देण्यात आली. सन १६७५ मध्ये धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी दिलेले त्यांचे बलिदान भारतीय इतिहासातील अतुलनीय घटना मानली जाते. त्यांनी अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहत सर्वधर्मसमभावाचा आदर्श जगासमोर ठेवला.“गुरु तेग बहादूर साहिबजींचे जीवन हे केवळ एका धर्मापुरते मर्यादित नसून संपूर्ण मानवजातीसाठी प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्या त्याग, धैर्य आणि मानवतेच्या संदेशातून प्रेरणा घ्यावी.” असे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करण्यात आले.
