भारतीय मजदूर संघाचे देशव्यापी ‘सरकार जगावो आंदोलन’
कल्याण: देशातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगार, कॉन्ट्रॅक्ट लेवर, निवृत्त कामगार, सुरक्षा रक्षक, स्कीम वर्कर्स, आशा, अंगणवाडी, घरेलू बांधकाम, रिक्षा टॅक्सी चालक, फेरीवाले, माथाडी आदी सर्व क्षेत्रातील कामगारांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी बुधवारी भारतीय मजदूर संघाने देशव्यापी सरकार जगावो आंदोलन केले. याच आंदोलनाचा भाग म्हणून भारतीय मजदूर संघ ठाणे जिल्ह्याच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते.
ठाणे जिल्ह्यातील सर्व कामगार संघटना मधील संघटित तसेच असंघटित क्षेत्रातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. ठाणे जिल्हा अध्यक्ष सचिन कदम आणि जिल्हा सचिव विलास आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना कामगारांच्या मागण्यांचे निवेदन सादर केले. ठाणे जिल्हाधिकारी यांच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदिप माने यांनी निवेदन स्वीकारले. केंद्रीय पश्चिम क्षेत्रासह संघटन मंत्री मोहन येणुरे यांची या आंदोलनात विशेष उपस्थिती होती.
