गाडी हळू चालवण्यास सांगितल्याने घरात घुसून हल्ला

कल्याण : किरकोळ कारणावरून उफाळलेल्या रागाने हिंसक रूप धारण केल्याची धक्कादायक घटना कल्याण तालुक्यातील टिटवाळा परिसरात घडली आहे. “गाडी हळू चालवा” अशी साधी सूचना दिल्याच्या रागातून काही तरुणांनी एका कुटुंबाच्या घरावरच धाड टाकत घरात घुसून तोडफोड केली आणि कुटुंबीयांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात तीन जण जखमी झाले असून काही काळ परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

टिटवाळा येथील आंबेडकर चौक परिसरातील आर. के. चाळजवळील राजेश्वरी बिल्डिंग परिसरात ही घटना घडली. झुल्फेकर अली अब्दुल्ला खान (वय ५०) हे आपल्या भावांसह फॅब्रिकेशन व्यवसाय करतात. ३ मार्च रोजी ते आपल्या भावांसोबत घराबाहेर उभे असताना एक तरुण मोटारसायकल अतिवेगाने चालवत त्या अरुंद रस्त्यावरून जात होता. परिसरात नागरिकांची वर्दळ असल्याने खान यांनी त्या तरुणाला गाडी सावकाश चालवण्याचा सल्ला दिला. मात्र या सूचनेवरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला आणि वातावरण तणावपूर्ण बनले.

वादानंतर काही वेळातच परिस्थिती अधिक गंभीर बनली. संबंधित तरुण काही वेळाने पुन्हा त्या ठिकाणी आला; मात्र यावेळी तो एकटा नव्हता. त्याने आपल्या वडिलांसह आणखी काही साथीदारांना सोबत आणले होते. घटनास्थळी पोहोचताच या टोळीने शिवीगाळ करत आक्रमक पवित्रा घेतला आणि थेट खान यांच्या घरावर धाड टाकली. लोखंडी वस्तूंच्या साहाय्याने घरातील साहित्याची तोडफोड करण्यात आली. या दरम्यान झुल्फेकर खान यांच्यावरही हल्ला करण्यात आला. त्यांच्या डोक्यावर वार करण्यात आले तसेच चेहऱ्यावर मारहाण झाल्याने त्यांचे दोन दात पडल्याचे तक्रारीत नमूद आहे.

या झटापटीत कुटुंबातील आणखी दोन सदस्य जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दरम्यान घडलेला संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाला आहे. त्यामुळे या हल्ल्याचे महत्त्वाचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले असून तपासाला वेग मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणी कल्याण ग्रामीण टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *