छत्रपती शिवाजी महाराज चषक स्पर्धांचा भव्य आराखडा जाहीर
राज्यभरात क्रीडा जल्लोषाची तयारी; राज्यभर क्रीडा उत्सवाचा शुभारंभ होणार
अंबरनाथ, नागपूर, बीड आणि बारामती येथे राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन
कै. भाई नेरुरकर चषक खो-खो स्पर्धा बारामती येथे
छत्रपती शिवाजी महाराज चषक हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ येथे,
छत्रपती शिवाजी महाराज चषक कबड्डी स्पर्धा नागपूर येथे
व स्वर्गीय खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धा बीड येथे रंगणार
मुंबई : सन २०२५-२६ या वर्षात राज्यभर क्रीडा संस्कृतीला नवे बळ देणाऱ्या विविध राज्यस्तरीय स्पर्धांच्या आयोजनाचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. क्रीडाप्रेमींसाठी ही आनंदाची बातमी ठरत असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा क्रीडामहोत्सवाचा जल्लोष अनुभवायला मिळणार आहे. युवा खेळाडूंना संधी देणे, स्पर्धात्मक वातावरण निर्माण करणे आणि राज्याच्या समृद्ध क्रीडा परंपरेला चालना देणे या उद्देशाने विविध प्रतिष्ठित चषक स्पर्धांचे आयोजन राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये करण्यात येणार आहे.
चार शहरांत प्रतिष्ठेच्या स्पर्धा
बैठकीत घेतलेल्या निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय हॉलीबॉल स्पर्धा अंबरनाथ येथे, छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा नागपूर येथे, स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा बीड येथे, तसेच कै. भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा बारामती येथे आयोजित करण्यात येणार आहेत. या स्पर्धांमुळे राज्याच्या विविध भागातील खेळाडूंना एकत्र येऊन आपली कौशल्ये दाखवण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.
युवा खेळाडूंना व्यापक व्यासपीठ
राज्यातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी आणि युवा खेळाडूंना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन अत्यंत महत्त्वाचे असल्याचे बैठकीत अधोरेखित करण्यात आले. ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंना समान संधी मिळावी, त्यांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात आणि राष्ट्रीय स्तरावर चमक दाखवण्यासाठी आवश्यक संधी उपलब्ध व्हावी, यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही देण्यात आली.
महाराष्ट्राच्या क्रीडा परंपरेला नवे बळ
राज्यस्तरीय स्पर्धांमुळे नवोदित खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची मोठी संधी मिळेल तसेच क्रीडा क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल. या स्पर्धांमधून अनेक प्रतिभावान खेळाडू पुढे येऊन महाराष्ट्राची क्रीडा परंपरा अधिक बळकट करतील आणि भविष्यात राज्याला अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू मिळतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा विश्वास
याबाबत बोलताना उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी सांगितले की, राज्यातील क्रीडा विकासासाठी अशा स्पर्धा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या स्पर्धांमधून उभारी घेणारे खेळाडू भविष्यात देशाचे प्रतिनिधित्व करतील आणि महाराष्ट्राचे नाव राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करतील, असा त्यांना विश्वास आहे.
