बदली होऊन तीन महिने लोटले तरी व्यवस्थापक कल्याण आगारातच

कल्याण : ‘महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळा’च्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण आगारात आगार व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले महेश भोये यांची पालघर जिल्ह्यातील नालासोपारा येथे बदली केल्याचे आदेश निघून आता तीन महिने उलटले आहेत. मात्र, ते अद्याप कामाच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर नक्की वरदहस्त कोणाचा आहे? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे आगार म्हणून कल्याण आगाराकडे पाहिले जाते. सध्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पांतर्गत पुनर्विकासाचे काम येथे सुरू आहे. त्यामुळे काही बससेवा तात्पुरत्या स्वरूपात विठ्ठलवाडी आगारातून किंवा जवळच्या बॅडमिंटन कोर्ट परिसरातून चालविल्या जातात. आगाराचा कारभार विठ्ठलवाडी डेपोतून सुरू असल्याने या ठिकाणचे आगार व्यवस्थापक भोये यांची आणि विठ्ठलवाडी आगाराचे व्यवस्थापक नवजोत गावडे यांच्यात घनिष्ठ मैत्री झाली. त्यामुळे गावडे यांनी भोये यांच्या वाढदिवसानिमित्त विठ्ठलवाडी डेपोत केक कापून आणि फटाके वाजविले. याच ठिकाणी ‘सीएनजी’ पंप असून, तिथे फटाके फोडल्याने एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. या घटनेची गंभीर दखल घेत परिवहन महामंडळाने गावडे यांची बदली वेंगुर्ला येथे, तर भोये यांची बदली डहाणू येथे करण्याचे निर्देश दिले.

त्यानंतर गावडे यांनी आपला कार्यभार स्वीकारला. मात्र, भोये यांनी आदेश येऊन तीन महिने उलटले तरी अद्याप नवीन कार्यभार स्वीकारला नाही. ‘सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघा’चे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रल्हाद सपकाळ यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे प्रवाशांना मिळणाऱ्या अपुऱ्या सोयीसुविधा, राज्य कर्मचाऱ्यावर होत असलेला अन्याय आणि कल्याण आगारातील भोंगळ कारभार याविषयी लेखी निवेदन दिले आहे.

महामंडळात एका अधिकाऱ्याला तीन वर्षे झाली की, त्याची बदली करावी लागते; पण याला कल्याण आगारातील भोये हे अपवाद आहे. मागील ११ वर्षांपासून ते कल्याण डेपोमध्ये कार्यरत आहेत. साहाय्यक कार्यशाळा अधीक्षक, प्रभारी डेपो मॅनेजर, नियमित डेपो मॅनेजर ही सर्व पदे त्यांनी याठिकाणी भूषविली आहेत; पण बदलीच्या ठिकाणी ते का रुजू होत नाहीत, अशी चर्चा आगारातील कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *