ऑफ्रोहचे आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

ठाणे: सक्षम अधिकाऱ्याने संपूर्ण चौकशीअंती दिलेले जात प्रमाणपत्र लबाडीने रद्द केल्यामुळे अधिसंख्य पदावर वर्ग केलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना सेवकाळातील फायदे नाकारणाऱ्या आणि त्यांच्या सेवेत अडथळे आणण्याचे प्रयत्न करणाऱ्या शासकीय धोरणाच्या विरोधात ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्युमन, महाराष्ट्र (ऑफ्रोह) संघटनेतर्फे सोमवार, ९ मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती ऑफ्रोहचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रोहित तरे यांनी दिली.

यासंदर्भात ऑफ्रोहचे ठाणे जिल्हा अध्यक्ष रोहित तरे म्हणाले, जबाबदार अधिकाऱ्याने पूर्ण चौकशी करून दिलेले अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र हेतूपुरस्सर लबाडीने रद्द करण्यात आली. अशा रद्द झालेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना शासनाने अधिसंख्य पदावर वर्ग केले आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने २८.४.२५ रोजी नियमित आणि स्थायी झालेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करता येणार नसल्याचा निर्णय दिला. पण अधिसंख्य पदावर असलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सेवेतील फायदे नाकारत त्यांना अडचणीत आणले जात आहे. शासनाकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीचा निषेध म्हणून संघटनेच्या पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय बैठकीत ९ मार्च रोजी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता.या राज्यव्यापी आंदोलनाचा भाग म्हणून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

जात  प्रमाणपत्र बाबत खोटे आक्षेप घेऊन पदोन्नती साठी पात्र असलेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना पदोन्नती नाकारली जात आहे. याशिवाय सेवकाळातील १०, २० आणि ३० वर्षानंतर मिळणारे आश्र्वासित प्रगती योजनेचे लाभ न देणे, मृत झालेल्या कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वारसांना सेवानिवृत्त वेतन नाकारणे, आंतर जिल्हा बदली न देणे, काल्पनिक वेतनवाढ गृहीत धरून वेतन लाभ नाकारणे,  सेवासमाप्ती कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्यात खाजगी शिक्षण संस्थाकडून  होत असलेली दिरंगाई, आणि इतर मागण्यांसाठी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी हे आंदोलन होणार असल्याचे रोहित तरे यांनी सांगितले.

या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन ऑफ्रोहच्या ठाणे जिल्हा शाखेचे अध्यक्ष रोहित तरे, ठाणे जिल्हा महिलाध्यक्षा निर्मला पाडळकर, सचिव हिरामण सोनावणे, कार्यकारिणी सदस्या प्रिया खापरे, दयानंद कोळी, नरेश खापरे, घनश्याम हेडाऊ, नंदनवार ,अजय कोळी,प्रकाश कोळी,अर्जुन मेस्त्री,राकेश डोलकर, स्मिता भोईर, रेखा पाटील, राजेंद्र दांडूक, सुरेश नाखवा,चंद्रशेखर ठाणेकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *