ठाणे न्यायालयाचा रेल्वेला तात्पुरता ‘ब्रेक’

दिव्यातील बांधकामांवरील कारवाईला स्थगिती

दिवा: दिवा रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे स्वतःच्या जागेचा दावा करत असलेल्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या ३ ते ४ इमारतीं आणि व्यावसायिक गाळ्यांवरील तोडक कारवाई सध्या स्थगित झाली आहे. संबंधित जागा मालकांनी दाखल केलेल्या अपीलावर सुनावणी घेत ठाणे न्यायालयाने रेल्वे प्रशासनाच्या कारवाईला तात्पुरती स्थगिती दिली आहे. त्यामुळे या इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

दिवा रेल्वे स्थानकाजवळील जागा १९६२ साली रेल्वेने ताब्यात घेतली असून त्याबदल्यात जागा मालकांना मोबदला देण्यात आल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला आहे. तरीही या जागेवर इमारती उभारण्यात आल्याने त्या अतिक्रमण करून उभारलेल्या अनधिकृत बांधकामांमध्ये गणल्या जात असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वेकडून संबंधित इमारतींना नोटीस बजावत त्या १५ दिवसांत रिकाम्या करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच त्यानंतर तोडक कारवाई करण्याचे नियोजनही करण्यात आले होते.

नोटीस मिळाल्यानंतर रहिवासी आणि जागा मालकांनी रेल्वेला उत्तर सादर केले होते. त्यानंतर रेल्वेच्या मालमत्ता विभागाकडे याबाबत सुनावणी घेण्यात आली. या सुनावणीत रेल्वे प्रशासनाने पुन्हा एकदा या इमारती अनधिकृत असल्याचे नमूद करत १५ दिवसांत कारवाई करण्याचा निर्णय कायम ठेवला. दरम्यान, या निर्णयाविरोधात ऍड. निखिल वाडीकर आणि ऍड. कस्तूर पाटील यांनी ठाणे न्यायालयात अपील दाखल केले. या अपीलावर झालेल्या सुनावणीत ठाणे न्यायालयाने रेल्वेच्या कारवाईला स्थगिती दिली. त्यामुळे प्रस्तावित तोडक कारवाई तात्पुरती थांबली असून पुढील सुनावणीपर्यंत रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *