ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी कबड्डी स्पर्धा – २०२६
किल्ले माऊली, नवतरुण, जय भारत महिलांत, तर छत्रपती शिवाजी, स्वामी विवेकानंद पुरुषांत तिसऱ्या फेरीत.
ठाणे : ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने ऍडव्होकेट पूजा राजा ठाकूर यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत किल्ले माऊली, नवतरुण, जय भारत यांनी महिलांत, तर छत्रपती शिवाजी, स्वामी विवेकानंद यांनी पुरुषांत तिसरी फेरी गाठली. कळवा, खारेगाव, ठाणे(प.) येथील खारलँड मैदान, सह्याद्री हायस्कुलच्या समोरील मैदानात आज पासून सुरु झालेल्या महिलांच्या दुसऱ्या फेरीत किल्ले माऊली संघाने राहुल मंडळावर ५५-१८ अशी सहज मात केली. सुरुवातीलाच २ लोण देत किल्ले माऊलीने पूर्वार्धात २९-११ असे वर्चस्व राखले. उत्तरार्धात आणखी २ लोण देत गुणांचे अर्धशतक पार केले. मयुरी जोशी, मयुरी शेलार, संजना विशे यांच्या चढाई पकडीच्या झंझावाती खेळाला या विजयाचे श्रेय जाते. दुसऱ्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात नव तरुण मंडळाने मध्यंतरातील ०८-१३ अशा पीछाडीवरून शिवतेज संघाला २५-२४ असे चकवीत आगेकूच केली. वैभवी कासार, रिबीका गावीत यांनी आक्रमक खेळ करीत शिवतेजला विश्रांतीला आघाडी दिली होती. पण विश्रांतीनंतर नव तरुण संघाच्या संयमी यादव, भाविका यांनी तुफानी खेळ करीत संघाला तिसरी फेरी गाठवून दिली.
महिलांच्या शेवटच्या सामन्यात जय भारतने स्व. राकेशदादा म्हात्रे संघाचा ४५-२० असा पराभव करीत तिसरी फेरी गाठली. पुरुषांच्या दुसऱ्या फेरीत छत्रपती शिवाजी महाराज संघाने नवरत्न मंडळाचा ३९-१३ असा पाडाव केला. पूर्वार्धात २५-०३ अशी आघाडी घेणाऱ्या छत्रपती शिवाजीने उत्तरार्धात सावध खेळ करीत आपला विजय साकारला. वेदान्त नायक, ओमकार मोरे, तन्मय परब यांच्या चतुरस्त्र खेळाला याचे श्रेय जाते. नवरत्नचा देवराज बने बरा खेळला. दुसऱ्या सामन्यात स्वामी विवेकानंदने राज मंडळाचा प्रतिकार २८-१२ असा संपविला. पहिल्या डावात १४-०४ अशी विवेकानंद संघाकडे आघाडी होती. यश पाटील, कुणाल पानसरे या विजयात चमकले. या स्पर्धेचे उदघाटन ऍडव्होकेट पूजा राजा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
