मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजनेच्या अंमलबजावणीला पालघर जिल्ह्यात वेग जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांचे विशेष प्रयत्न
पालघर : (अशोक गायकवाड )-ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देत शेतीमालाची सुलभ वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ अंमलबजावणीला पालघर जिल्ह्यात वेग आला आहे. बारमाही शेतरस्त्यांची निर्मिती व मजबुतीकरण करून शेतापर्यंत पोहोच सुलभ करण्याचा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. शेतीत वाढत्या यांत्रिकीकरणामुळे ट्रॅक्टर, कापणी यंत्रे व इतर आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतांपर्यंत मजबूत आणि दर्जेदार रस्ते असणे अत्यंत आवश्यक झाले यांचे विशेष प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने १४ डिसेंबर २०२५ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे महसूल विभागामार्फत ही स्वतंत्र योजना राबविण्याचे निर्देश दिले आहेत. पालघर जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी, समन्वय आणि सनियंत्रण जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी राज्यस्तरीय समिती, जिल्हास्तरीय कार्यकारी समिती आणि विधानसभा क्षेत्रस्तरीय समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील विविध यंत्रणांमध्ये सुसूत्रता राखून जबाबदाऱ्या स्पष्टपणे निश्चित करण्यासाठी या समित्या महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. सन २०२५-२६ या वर्षासाठी योजनेअंतर्गत आवश्यक असणाऱ्या यंत्रसामग्री व पाईप पुरवठ्याचे दर निश्चित करण्यासाठी नोंदणीकृत यंत्रणाधारकांकडून विधानसभा क्षेत्रनिहाय दरपत्रक मागविण्यात येत आहे. यासाठी “http://mahatenders.gov.in” या संकेतस्थळावर निविदा प्रसिद्ध करण्यात आली असून संबंधितांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. या योजनेअंतर्गत बांधण्यात येणाऱ्या शेतरस्त्यांची गुणवत्ता काटेकोरपणे तपासली जाणार आहे. तसेच रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत वृक्षलागवड करण्यात येणार असल्याने पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे. “मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना अधिक प्रभावीपणे सक्षम करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. इंदु राणी जाखड यांनी केले .
