आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्जास २५ मार्चपर्यंत मुदतवाढ
आता ३ ते ५ किमी अंतरावरील शाळांचे पर्याय निवडण्याची संधी
अनिल ठाणेकर
ठाणे, शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी विनाअनुदानित शाळांमधील २५ टक्के राखीव प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले असून ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत आता २५ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच पालकांना आता ३ ते ५ किलोमीटर अंतरावरील शाळांचे पर्याय निवडण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार शाळेच्या अंतरासंबंधीची १ किलोमीटरची अट शिथिल करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्वी केवळ १ किमी अंतरातील शाळा निवडण्याची मर्यादा असताना आता पालकांना अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत. या निर्णयामुळे अधिकाधिक पात्र बालकांना इच्छित शाळांमध्ये प्रवेश मिळण्यास मदत होणार आहे. तसेच, १६ मार्चपर्यंत ज्या पालकांनी आरटीई २५ टक्के प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरले आहेत, त्यांना अर्जामध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी ‘अनकन्फर्म’ करून पुन्हा ‘कन्फर्म’ करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबत संबंधित पालकांना पोर्टलवर पॉप-अप विंडोच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबत शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद ठाणे बाळासाहेब राक्षे यांनी सांगितले की, “आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत अधिकाधिक पात्र बालकांचा समावेश व्हावा, यासाठी शासनाच्या निर्देशानुसार अर्ज भरण्याची मुदत २५ मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच शाळांच्या अंतराची अट शिथिल केल्यामुळे पालकांना अधिक पर्याय उपलब्ध झाले आहेत. सर्व पात्र पालकांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन ऑनलाईन अर्ज सादर करावेत.” तरी सर्व संबंधित पालकांनी या मुदतवाढीचा लाभ घेऊन अर्जामध्ये आवश्यक दुरुस्ती करून अथवा नवीन अर्ज सादर करून प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, तसेच क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी व शाळांनी ही माहिती जास्तीत जास्त पालकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.
