रामबाग परिसरातील नागरिक भटक्या कुत्र्यांच्या त्रासाने त्रस्त
नगरसेविका स्वप्नाली केणे यांनी वेधले महासभेचे लक्ष
कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असून सोमवारी पार पडलेल्या महासभेत हा मुद्दा चांगलाच गाजला. कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात देखील भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नागरिकांच्या या समस्येकडे प्रभाग क्र. ६ च्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेविका स्वप्नाली केणे यांनी पहिल्याच महासभेत संपूर्ण सभागृहाचे लक्ष वेधले.
रामबाग परिसरात सव्वाशे ते दीडशे कुत्र्यांची संख्या असून लहानमुलांपासून जेष्ठ नागरिकांपर्यंत शेकडो लोकांना हे भटके कुत्रे चावले आहेत. या परिसरात चार शाळा, दोन महाविद्यालये आहेत. त्यामुळे हा भागात लहान मुलं, विद्यार्थी यांची वर्दळ जास्त आहे. काही श्वानप्रेमी त्यांना कच्चे मांस खायला देत असल्याने ते अधिक आक्रमक होत आहेत. त्यामुळे त्यांचे चावण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यासाठी महापालिकेच्या वतीने लवकरात लवकर उपाययोजना करून नागरिकांची होणाऱ्या त्रासातून मुक्तता करण्याची मागणी नगरसेविका स्वनाली केणे यांनी सभागृहात केली आहे. दरम्यान गृहिणी असलेल्या स्वप्नाली केणे यांनी पहिल्याच महासभेत जनतेच्या न्यायहक्कासाठी आवाज उठवल्याने नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
