ठाणे: येथे आणि पालघर जिल्ह्यामधे सध्या एमडीचा (मेफेड्रीन) बोलबाला आहे.  पूर्वी या जिल्ह्यांमधे गांजा, चरस, अफू, कोकेन व नशा करणाऱ्या इंजेक्शनची चलती होती. आता मात्र नशेखोरांना एमडीची चटक लागली आहे. इतर नशिल्या पदार्थांपेक्षा वीस पट अधिक किंमतीला विकल्या जाणाऱ्या या अमली पदार्थांने गरीबांपासून – श्रीमंता पर्यंत वेड लावले आहे. विशेष म्हणजे पैशांच्या हव्यासापोटी उच्चभ्रू घरांतील उच्चशिक्षीत तरुणही एमडीचे विक्रेते बनले आहेत. या ‘पेडलर्स’ मध्ये अनेक तरुण – तरुणींचा सहभाग आहे. ते बिनदिक्कतपणे या ड्रग्जची तस्करी करत आहेत.
दोन्ही जिल्ह्यांमधील काही फार्म हाऊस, बंद कंपण्या, पडीक बंगले वा इमारतींमधे एमडी बनवण्याचे कारखाने चालवले जातात.     एमडी अर्थात मेफेड्रीन बनवायला फार मोठी जागा लागत नसल्याने बंद फ्लॅट, गोडाऊन वा लहान खोलीमधेही ते बनवता येते. त्यामुळे बनवणाऱ्यांचे प्रमाण हे खूप वाढते आहे. त्यातच इतर नशिला पदार्थांपेक्षा नशा चढण्याचे प्रमाण एमडीमधे कैकपट जास्त असते. हा अमली पदार्थ नैसर्गिक वातावरणाऐवजी पूर्णपणे मानवनिर्मीत आहे आणि खप मोठ्या प्रमाणावर असल्याने बनवण्याचे प्रमाणही खूप अधिक आहे.
एमडीची विक्री करण्यासाठी सोशल मिडीयाचा वापरही सर्रास होतो. “टेलिग्राम, स्नॅपचॅट किंवा इंस्टाग्राम” सारखा ॲप वरून ‘कोड वर्ड’ वापरून केली जाते. एमडीची एकदा चटक लागली की ती सुटत नाही. व्यसन लागून राहते. १० हजार ते १५ हजार रुपये प्रती ग्रॅम दराने ती विकली जाते, तरीही तरुण ती विकत घेतात, हे विशेष. या एमडी ड्रग्जमुळे थेट मेंदूवर परीणाम होतो. त्यामुळे तीव्र नैराश्य, भीती वाटते, हृदयाचे ठोके अनियंत्रीत होणे, असे गंभीर परीणाम होतात. दिर्घकाळ सेवनाने स्मरणशक्तीही कायमस्वरूपी जाऊ शकते. मृत्यूही ओढवतो, असे डॉक्टर म्हणतात.
एवढे प्रचंड  वाईट परीणाम होणाऱ्या या एमडीच्या विक्रीवर शासनाने अनेक बंधने घातली आहेत.     अगदीच ड्रग्जची तस्करी केल्यास मोक्कांअंतर्गत कारवाईही होते. तरीही बिनदिक्कतपणे ही ड्रग्स बनवली जाते आणि विकलीही जाते, हे पोलीसांचे अपयश म्हणावे लागेल. जी गोष्ट गाव – खेड्यांतील सामान्य माणसाला माहिती आहे. शाळा – कॉलेजमधील मुलांना माहिती आहे, तीच गोष्ट स्थानिक पोलीसांना माहिती नाही? असे होणे शक्य नाही. तरीही कठोर कारवाईचे पाऊल पोलीस का उचलत नाहीत? हाच खरा प्रश्न आहे. तरुण पिढी बरबाद करायची नसेल तर ड्रग्ज बनवणारे, विकणारे व खरेदी करणारे यांच्यावर कठोर कारवाई झालीच  पाहिजे,असे आवाहन, वाडा येथील पत्रकार   शरद यशवंत पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *