लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वर्षनिमित्त

पनवेल : (अशोक गायकवाड )—-थोर दानशूर व्यक्तिमत्व आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त पनवेलमध्ये ‘अप्रचलित रागांवर आधारित ७५ अभंगांचे’ भव्य लोकार्पण अत्यंत उत्साहात, दिमाखात आणि आध्यात्मिक वातावरणात पार पडले. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि नाद ब्रह्म साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाने पनवेलच्या सांस्कृतिक परंपरेत एक उल्लेखनीय भर घातली. मार्केट यार्ड येथील रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनेते रामशेठ ठाकूर होते. प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील, मंडळाचे उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, गुरुवर्य पं. निवृत्तीबुवा चौधरी, नाद ब्रह्म साधना मंडळाचे अध्यक्ष वसंत पाटील तसेच रायगड भूषण पं. उमेश चौधरी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची मंगल सुरुवात झाली. त्यानंतर ७५ अभंगांचे लोकार्पण करण्यात आले. अप्रचलित आणि अनवट रागांवर आधारित सादर करण्यात आलेल्या या अभंगांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. शास्त्रीय संगीताची गोडी आणि भक्तीभाव यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाल्याने संपूर्ण सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले. मान्यवरांनी आपल्या मनोगतात या उपक्रमाचे कौतुक करत भारतीय शास्त्रीय संगीत परंपरेच्या जतन व संवर्धनासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. नवोदित कलाकारांना प्रेरणा आणि योग्य दिशा देणारा हा उपक्रम ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. भजनसम्राट पं. निवृत्तीबुवा चौधरी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमांतर्गत अभंगांची चित्रफीत सामाजिक माध्यमांवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थी, शिष्यवर्ग आणि संगीत अभ्यासकांना रागांची शास्त्रशुद्ध ओळख होण्यास मोठी मदत होणार आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरेतील रागसंवर्धन आणि सातत्यपूर्ण जतन हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असून, या माध्यमातून भक्ती, संस्कार आणि संगीत यांचा सुंदर संगम समाजास अनुभवता येणार आहे. हा सोहळा केवळ लोकार्पणापुरता मर्यादित न राहता पनवेलच्या सांस्कृतिक इतिहासात एक अविस्मरणीय ठसा उमटवणारा ठरला. अमृत महोत्सव वर्षाला या उपक्रमामुळे एक विशेष सांस्कृतिक आणि आध्यात्मिक अधोरेखा लाभली आहे. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे औक्षण करून त्यांना शतायुषी शुभेच्छा देण्यात आल्या. आपल्या मनोगतात त्यांनी या आध्यात्मिक कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल कौतुक व समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मच्छिन्द्र पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *