राजू शेट्टी यांचे प्रतिपादन
रत्नागिरी (प्रतिनिधी )– कोकणातील आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांना मागणी केल्याप्रमाणे येत्या १५ मे पर्यंत नुकसान भरपाई न मिळाल्यास हजारो शेतकरी आणि बागायतदार मुंबईतील ‘वर्षा’ बंगल्यावर धडक देतील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे. बालाजी मंगल कार्यालयात आयोजित शेतकरी एल्गार मेळाव्यात शेट्टी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ‘उबाठा’ सेनेचे माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार बाळ माने,जिल्हाप्रमुख दत्ता कदम, बाबा साळवी,नेहा माने आदी अनेक नेते उपस्थित होते.
कोकणातील आंबा -काजू उत्पादक शेतकरी आणि बागायतदार निसर्गाच्या लहरीपणामुळे पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.असे असताना सरकारकडून जाहीर झालेली मदत ही शेतकऱ्यांचा घोर अपमान करणारी आहे आणि म्हणूनच आता ‘वर्षा’वर धडक दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. शेतकऱ्याल नुकसान भरपाई म्हणून प्रति झाड २५० रुपये देणे ही क्रूर थट्टा आहे. त्यांना प्रति झाड पाच हजार रुपये नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे या मागणीवर भर देऊन, प्रत्यक्षात मागितलेली मदत मिळेपर्यंत हा लढा चालूच राहील असे शेट्टी यांनी स्पष्ट केले.
कोकणच्या हापूसला जागतिक स्तरावर ‘जीआय’ टॅग मिळाला असला तरी हवामान बदलाच्या संकटामुळे हापूसचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. मागील दोन- तीन वर्षापासून सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे बागायतदारांचा उत्पादन खर्चही प्रचंड वाढला असून हा खर्च भरून निघणे अवघड झाले आहे. तेव्हा शेतकरी -बागायतदारांनी आता जागे व्हावे आणि १५, मे च्या या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. मेळाव्याला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी आणि आंबा बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी खासदार विनायक राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली. रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी सरकारकडे पैसा आहे मात्र कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या आंबा -काजू उत्पादकांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार तिजोरी का उघडत नाही असा सवाल करून १५, मे च्या आंदोलनात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले. यंदा उत्पादन अत्यल्प झाल्यामुळे शेतकरी- बागायतदार आर्थिक अडचणीत सापडला आहे. अशावेळी खते आणि कीटकनाशके विकणाऱ्या कंपन्यांनी शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी तगादा लावला आहे तो त्यांनी लावू नये अन्यथा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आला.
वाशी मार्केट मधील दलाल आणि अडत्यांनी संगनमत करून दर पाडू नयेत जेणेकरून शेतकऱ्यांना दोन पैसे अधिक मिळतील अशी अपेक्षाही राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.
