कल्याण : रस्ते विकास आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली शहरांचे ‘फुफ्फुस’ असलेल्या वृक्षांचा गळा घोटला जात असल्याचे गंभीर वास्तव ‘सुराज्य अभियाना’च्या राज्यव्यापी पाहणीत उघड झाले आहे. नियम धाब्यावर बसवून वृक्षांची ‘मूक हत्या’ केली जात असून, वृक्षारोपण केलेले सुमारे १७ हजार वृक्ष बेपत्ता झाल्याचा धक्कादायक आरोपही अभियानाकडून करण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेने १ एप्रिल २०२६ पासून ‘वृक्ष संजीवनी’ अभियान सुरू करून झाडांभोवतीचे काँक्रीट काढण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. मात्र, या मोहिमेच्या मूळ हेतूवरच सुराज्य अभियानाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘सुराज्य अभियान’चे राज्य समन्वयक अभिषेक मुरुकटे यांनी सांगितले की, झाडांभोवतीचे काँक्रीट काढणे हा केवळ तात्पुरता उपक्रम नसून, अशी वेळच का येते याचा विचार करणे गरजेचे आहे. रस्ते बांधकाम करताना ‘नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल’च्या आदेशांचे उल्लंघन करून झाडांच्या बुंध्यापर्यंत काँक्रीट ओतले जाते, हीच मूळ समस्या आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, केवळ ‘काँक्रीट काढा’ अभियान राबवण्याऐवजी, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर NGT Act २०१० च्या कलम २६ अन्वये फौजदारी गुन्हे दाखल करणे आवश्यक आहे.

जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मुंबई मराठी पत्रकार संघ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केली. यावेळी हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ता डॉ. उदय धुरी, अधिवक्ता प्रथमेश गायकवाड आणि अधिवक्ता गणेश कोळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *