मृत कुटुंबीयांच्या पुनर्वसनासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करणार : डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे : फुगेवाडी व हडपसर परिसरात घडलेल्या विषारी दारू प्रकरणामुळे अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली असून, या घटनेला जबाबदार असलेल्या दोषींना कठोरातील कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी शिवसेना नेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार डॉ. गोऱ्हे यांनी रविवारी फुगेवाडी परिसराला भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले तसेच शिवसेनेच्या वतीने तातडीची आर्थिक मदतही सुपूर्द केली.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे, इरफानभाई सय्यद, महिला जिल्हाप्रमुख मनीषा परांडे, निलेश हाके, संजय काटे, मनीषा करंडे, अविनाश जाधव, ब्रिजेश नागदेवते, बाबू बापूर, श्रीकांत शेवाळे, करण काळे, सचिन खलसे, शैलेश हाके, गणेश आयाळी आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. निकाळजे, आनंद पांडेराव देसाई, अकबर अझीमखान पठाण, राजेश शांताराम राजपूत, सचिन रामचंद्र नेटके आणि बाबा सैय्यद हुसेन शेख यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली. हडपसरमधील चार कुटुंबांना ३० मे रोजी मदत करण्यात आली असून उर्वरित पीडित कुटुंबांनाही लवकरच ऑनलाइन पद्धतीने आर्थिक सहाय्य दिले जाणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. आतापर्यंत दोन्ही भागांतील सुमारे १३ कुटुंबांना मदत करण्यात आली आहे.
पीडित कुटुंबांच्या भेटीदरम्यान या दुर्घटनेची अत्यंत विदारक बाजू समोर आल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले. मृत्युमुखी पडलेले बहुतेकजण कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य होते. त्यामुळे अनेक घरांमध्ये आता महिला, लहान मुले आणि वृद्ध सदस्यच उरले आहेत. अल्पशिक्षित महिलांसमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. काही कुटुंबांमध्ये वृद्ध आणि दिव्यांग सदस्य असून त्यांचा सांभाळ करणारे कोणीही उरलेले नाही.
माध्यमांशी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, हा केवळ हातभट्टीचा प्रश्न नसून मिथेनॉलसारखी घातक रसायने पुरवणाऱ्या संपूर्ण साखळीचा शोध घेणे आवश्यक आहे. रासायनिक तपासणी अहवाल तातडीने जाहीर करून सक्षम सरकारी वकील नियुक्त करावेत तसेच हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, अशी मागणी त्यांनी केली.
स्थानिक शिवसैनिकांनी यापूर्वी लेखी तक्रारी दिल्या होत्या. तसेच खासदार श्रीरंग बारणे यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित केला होता. तरीही हातभट्ट्यांवर प्रभावी कारवाई झाली नाही, याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. छापे टाकल्यानंतरही अवैध धंदे पुन्हा सुरू कसे होतात, याची स्वतंत्र चौकशी व्हावी. केवळ कनिष्ठ अधिकाऱ्यांचे निलंबन न करता यामागील आर्थिक हितसंबंध उघड करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
राज्य शासनाने मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये आणि महानगरपालिकेने एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. या मदतीचे स्वागत करताना डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना तात्पुरता दिलासा मिळेल; मात्र त्यांच्या भविष्यासाठी रोजगार, शिक्षण आणि विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांना संपूर्ण परिस्थितीची माहिती देण्यात आली असून, पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना शेवटपर्यंत लढा देईल, अशी ग्वाही डॉ. गोऱ्हे यांनी दिली. दोषींना कठोर शिक्षा आणि पीडितांचे संपूर्ण पुनर्वसन होईपर्यंत हा पाठपुरावा सुरू राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *