मुंबई / रमेश औताडे
जगापुढे आज उभा ठाकलेला सर्वात भीषण आणि गहन प्रश्न म्हणजे वाढते जागतिक तापमान होय. औद्योगिकीकरण, बेसुमार वृक्षतोड, वाढते प्रदूषण, जलस्रोतांचा ऱ्हास आणि नैसर्गिक संसाधनांचा होत असलेला अतिरेकी वापर यामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत असून त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण मानवजातीला भोगावे लागत आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेत “एक तरी झाड लावा… स्वतःसाठी!” हा संकल्प अंगीकारावा, असे आवाहन महाराष्ट्र शासनाच्या कृषी भूषण सेंद्रिय शेती पुरस्कारप्राप्त आणि पर्यावरणप्रेमी उद्धव बाबर यांनी जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर केले आहे.
उद्धव बाबर म्हणाले, गेल्या काही दशकांमध्ये पृथ्वीच्या सरासरी तापमानात सातत्याने वाढ होत आहे. या तापमानवाढीमुळे ऋतुचक्रात मोठे बदल होत असून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, पूर आणि वादळांसारख्या नैसर्गिक आपत्तींची तीव्रता वाढली आहे. याचा थेट परिणाम शेती, जलसंपदा, जैवविविधता आणि मानवी आरोग्यावर होत आहे. ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाला हवामान बदलाचे सर्वाधिक चटके बसत असून कृषी क्षेत्र मोठ्या संकटाला सामोरे जात आहे.
ते म्हणाले, जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने प्रत्येकाने निसर्गाशी आपले नाते अधिक दृढ करण्याचा संकल्प करावा. वाढत्या तापमानाला आणि पर्यावरणीय ऱ्हासाला रोखण्यासाठी वृक्षारोपण व संवर्धन हा सर्वात प्रभावी आणि शाश्वत मार्ग असून, “एक तरी झाड लावा… स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि भविष्यातील पिढ्यांसाठी”, असा संदेश उद्धव बाबर यांनी दिला.
0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *