निवडणुकी वेळी निकष आठवले नाहीत का?; महायुती सरकारवर काँग्रेसचा हल्लाबोल
मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुमारे ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्याचा निर्णय हा राज्यातील महिलांच्या विश्वासाचा घात असल्याची टीका मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांची मते मिळवण्यासाठी योजना जाहीर करण्यात आली, मात्र सत्तेत आल्यानंतर निकष आणि अटींचा आधार घेत लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
प्रसिद्धीपत्रकाद्वारे बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष व महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दरमहा १,५०० रुपये देण्याची घोषणा केली होती. तसेच विधानसभा निवडणुकीदरम्यान ही रक्कम २,१०० रुपये करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. या आश्वासनांवर विश्वास ठेवून राज्यातील महिलांनी महायुतीला पाठिंबा दिला, मात्र सत्तेत आल्यानंतर सरकारने विविध निकष लागू करून लाखो महिलांना योजनेतून वगळण्यास सुरुवात केली आहे.
महायुती सरकारने गेल्या दोन वर्षांत विविध नियम, अटी आणि शर्थी लागू करत लाभार्थींची संख्या कमी करण्याचे प्रयत्न केले असून आता तब्बल ८० लाख महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे. हा निर्णय राज्यातील महिलांची फसवणूक करणारा असल्याचा आरोप त्यांनी केला.
वर्षा गायकवाड यांनी पुढे म्हटले की, निवडणुकांच्या काळात मोठमोठी आश्वासने देणारे भाजप आणि महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांची पूर्तता करण्यात अपयशी ठरत आहे. महिलांना २,१०० रुपये देण्याचे आश्वासन अद्याप पूर्ण झालेले नाही. उलट सध्या मिळणाऱ्या लाभावरही गदा आणली जात असल्याने महिलांमध्ये नाराजीची भावना निर्माण झाली आहे. लाडकी बहीण योजनेबाबत सरकारची भूमिका ही महिलांप्रती अन्यायकारक असून राज्यातील महिलांच्या भावना दुखावणारी आहे, अशी टीकाही खासदार वर्षा गायकवाड यांनी केली.
