१,५७० ग्राहकांचे सर्व मीटर स्मार्ट मीटरमध्ये रूपांतर
रायगड : राज्यभर महावितरणतर्फे स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम वेगाने सुरू असताना रायगड जिल्ह्यातील अलिबाग-१ उपविभागांतर्गत चौल-२ शाखा कार्यालयाने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. या शाखा कार्यालयातील सर्व १,५७० वीज ग्राहकांचे मीटर स्मार्ट मीटरमध्ये रूपांतर करण्यात आले असून रायगड जिल्ह्यात १०० टक्के स्मार्ट मीटर बसविणारे हे पहिले शाखा कार्यालय ठरले आहे.
महावितरणच्या कोंकण प्रादेशिक विभागाने आतापर्यंत सर्वाधिक ४३ लाख ३ हजार स्मार्ट मीटर बसविले आहेत. त्यामध्ये भांडुप परिमंडलाने १० लाखांहून अधिक स्मार्ट मीटर बसवून राज्यात दुसरे स्थान मिळविले आहे. रायगड जिल्ह्यात पेण मंडळ कार्यालयांतर्गत चार विभाग, १७ उपविभाग आणि १०५ शाखा कार्यालये कार्यरत असून स्मार्ट मीटर बसविण्याचे काम वेगाने सुरू आहे.
स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना अचूक व पारदर्शक वीज वापराची माहिती मिळत आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून वीज वापरावर लक्ष ठेवणे शक्य होत असून सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत वापरलेल्या विजेवर घरगुती ग्राहकांना सवलतीचाही लाभ मिळत आहे. रायगड जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ३.४० लाख वीज ग्राहकांना एकूण २.८३ कोटी रुपयांची वीजबिल सवलत देण्यात आली आहे.
चौल-२ शाखा कार्यालयाची ही यशस्वी कामगिरी शाखा अभियंता देवरत पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ग्राहकांमध्ये व्यापक जनजागृती व प्रबोधन करून साध्य केली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून वीज वापरावर नियंत्रण आणि ऊर्जा व्यवस्थापन अधिक सुलभ होऊ शकते, हे त्यांनी सिद्ध केले आहे. ही मोहीम अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड आणि उपविभागीय अधिकारी तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता संजय पाटील यांनी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *