नवी मुंबई – ऐरोली आणि बेलापूर विधानसभा क्षेत्रातील रहिवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून महावितरणाच्या ढिसाळ कारभाराचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सातत्याने वीजपुरवठा खंडित होणं, केबल जळण्याच्या घटना, ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड होणं, कमी दाबाचा वीजपुरवठा, रखडलेली सबस्टेशनची कामे, वाढत्या तांत्रिक समस्या, तासंतास नागरिकांना अंधारात राहावे लागणं या समस्या वारंवार घडत आहेत. या गंभीर प्रश्नाकडे महावितरण प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीने ऐरोली आणि बेलापूर महावितरण कार्यालयावर खासदार नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं.
बेलापूर येथे युवासेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अनिकेत रमाकांत म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अंकुश (बाबा) कदम, बेलापूर विधानसभा शहरप्रमुख किशोर पाटकर, नवी मुंबई महानगरपालिका गटनेते मनोज हळदणकर, ज्येष्ठ नेते तथा माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, माजी उपमहापौर मंदाताई म्हात्रे, शिवसेना संघटक सरोजताई पाटील, महिला संघटक शितलताई कचरे, नेरुळ विभागप्रमुख विजय माने, ज्येष्ठ नेते अंकुश सोनवणे, युवासेना उपजिल्हाप्रमुख ममित भोईर, युवासेना ऐरोली विधानसभा शहरप्रमुख चेतन पाटील, नगरसेविका अनिता मानवतकर, नगरसेविका चैताली पाटील, समाजसेवक भावेश पाटील, सुरेश मानवतकर यांच्यासह शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ऐरोली येथे गटनेते मनोज हळदणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी संपर्कप्रमुख अंकुश कदम, नगरसेविका व प्रभाग समिती अध्यक्षा हेमांगी सोनवणे, ऐश्वर्या सोनवणे, वैशाली पाटील, पूजा पाटील, आकाश मढवी, राजू पाटील, अंकुश सोनवणे, गगनदीपसिंग कोहली तसेच सर्व पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
नवी मुंबई हे देशातील एक नियोजित आणि आधुनिक शहर म्हणून ओळखले जाते. मात्र आजही नागरिकांना वीजेची समस्या जाणवत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिला वर्गाला त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच वातावरणीय बदलामुळे भयंकर उकाड्याने रहिवशांचा जीव कासाविस होत आहे. या गंभीर प्रश्नाची दखल खासदार नरेश म्हस्के यांनी घेतली. स्वत: खासदार नरेश म्हस्के यांनी या आंदोलनात सहभागी होत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यानंतर शिवसेनेच्या आक्रमक भूमिकेमुळे महावितरण  अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याचं आश्वासन दिलं.
नवी मुंबईसाठी स्वतंत्र केबल्स नागपूर आणि सिंधुदुर्ग येथून मागविण्यात आल्या असून चुकीचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारांवर कठोर कारवाई केली जाईल, तसेच नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्याचे कामही प्राधान्याने हाती घेण्यात येणार असल्याचं  अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.
आम्ही सत्ताधारी असलो तरी जनतेच्या प्रश्नांबाबत कोणतीही तडजोड करणार नाही. नागरिकांना दर्जेदार आणि अखंड वीजपुरवठा मिळालाच पाहिजे, ही आमची भूमिका आहे. येत्या काळातही समस्या कायम राहिल्यास  अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही, असा स्पष्ट आणि कठोर इशाराही यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी दिला.
यावेळी महावितरण प्रशासनाला निवेदन सादर करून नागरिकांच्या समस्या तातडीने सोडविण्याची मागणी करण्यात आली.
००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *