शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीलाच केलेल्या कारवाईमुळे तिसाई शाळेत गोंधळ
 कारवाई थांबवण्यासाठी प्रशासक आणि पालकांचे आवाहन
कल्याण: कल्याण-बिवली महानगरपालिकेने कल्याण पूर्वेतील आडीवली परिसरातील तिसाई शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे चालवल्या जाणाऱ्या तिसाई शाळेची इमारत पाडण्यास सुरुवात केली असून, त्यामुळे शाळेच्या आवारात खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे सुमारे १,२०० विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. या कारवाईचा निषेध करण्यासाठी आणि प्रशासनाकडून दिलासा मिळावा या मागणीसाठी मोठ्या संख्येने पालक घटनास्थळी दाखल झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, २०१० मध्ये स्थापन झालेली ही शाळा एकूण २० गुंठे जमिनीवर बांधलेली आहे. जमिनीच्या वाटणीवरून तीन भावांमध्ये सुरू असलेल्या वादामुळे हे प्रकरण निर्माण झाल्याचे वृत्त आहे. शाळेची इमारत बेकायदेशीर असल्याचा आरोप करत एका भावाने महानगरपालिकेकडे तक्रार दाखल केल्यानंतर प्रशासनाने पाडकामाची कारवाई सुरू केली.
शाळेचे संचालक बाळाराम गायकवाड म्हणाले की, महानगरपालिकेला कारवाई करायचीच होती, तर शाळांना सुट्टी असताना एप्रिल किंवा मे महिन्यात करायला हवी होती. आता नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे आणि अशा वेळी कारवाई केल्याने सुमारे १,२०० मुलांचे शिक्षण विस्कळीत होईल आणि त्यांचे भविष्य धोक्यात येईल. शाळेचे मुख्याध्यापक दशरथ म्हात्रे यांनीही प्रशासनाला आवाहन केले की, मुलांच्या हितासाठी ही पाडकामाची कारवाई तात्काळ थांबवावी, जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही.
या कारवाईचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने पालकही शाळेच्या आवारात जमले होते. पालक कनविका साळवे म्हणाल्या की, या अचानक कारवाईमुळे मुलांचे भविष्य अंधकारमय होईल. त्यांनी प्रशासनाकडे किमान एक वर्षाची मुदतवाढ मागितली, जेणेकरून पालकांना आपल्या मुलांना दुसऱ्या शाळेत दाखल करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. त्या म्हणाल्या की, शैक्षणिक सत्र सुरू झाल्यानंतर लगेचच प्रवेश मिळवणे अत्यंत कठीण असते.
या संपूर्ण प्रकरणामुळे शिक्षण व्यवस्थेबद्दल आणि प्रशासकीय कारवाईच्या वेळेबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. जमिनीच्या वादामुळे निष्पाप मुलांना त्याचे परिणाम भोगावे लागू नये असे  स्थानिक लोकांचे म्हणणे आहे. याबाबत सहाय्यक आयुक्त सुनील लोंढे यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *