अविनाश उबाळे
ठाणे : शहापूर तालुक्यातील फुगाळे येथील रास्त भाव दुकानाच्या कारभाराबाबत गंभीर तक्रारी समोर आल्या असून दर महिन्याला सुमारे २५ ते ३० शिधापत्रिकाधारक कुटुंबांना नियमित धान्य मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.विशेषतःमे आणि जून २०२६ या दोन महिन्यांचे धान्य अनेक लाभार्थ्यांना अद्याप मिळाले नसल्याची तक्रार संबंधित नागरिकांनी शहापूर तालुका पुरवठा अधिकारी यांच्याकडे लेखी व तोंडी स्वरूपात केली आहे.
गावातील शिधापत्रिकाधारकांनी सांगितले की, शासनाकडून गरीब व गरजू कुटुंबांसाठी वितरित करण्यात येणारे धान्य हे त्यांच्या उदरनिर्वाहाचे महत्त्वाचे साधन आहे. मात्र फुगाळे येथील रास्त भाव दुकानातून अनेक कुटुंबांना नियमित धान्य मिळत नसल्याने त्यांना मोठ्या आर्थिक व सामाजिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.अनेक वेळा दुकानावर जाऊनही धान्य उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते किंवा विविध कारणे देऊन लाभार्थ्यांना परत पाठविले जाते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
या संदर्भात गावातील काही रेशनधारकांनी प्रत्यक्ष धान्य मिळत नसल्याचा व्हिडिओ तयार करून संबंधित प्रशासनाकडे पाठविला आहे. या व्हिडिओमध्ये लाभार्थी आपली व्यथा मांडताना दिसत असून अनेक कुटुंबांना धान्यापासून वंचित ठेवले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे.त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.सध्या पावसाळ्याची सुरुवात झाली असून ग्रामीण भागातील अनेक मजूर कुटुंबांना नियमित रोजगार उपलब्ध झालेला नाही. शेतीची कामे अद्याप पूर्णपणे सुरू नसल्याने अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत आहेत.अशा परिस्थितीत शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील धान्य हेच अनेक कुटुंबांसाठी जगण्याचा आधार ठरत असते.मात्र हे धान्य वेळेवर मिळत नसल्याने संबंधित कुटुंबांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
गावकऱ्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की,फुगाळे येथील रास्त भाव दुकानाच्या कामकाजाची तातडीने चौकशी करण्यात यावी, मे व जून २०२६ चे थकीत धान्य त्वरित लाभार्थ्यांना वितरित करण्यात यावे आणि भविष्यात कोणतेही कुटुंब धान्यापासून वंचित राहणार नाही याची खात्री करण्यात यावी. शासनाच्या योजनांचा लाभ खऱ्या अर्थाने गरजूंपर्यंत पोहोचावा आणि सार्वजनिक वितरण व्यवस्थेवरील नागरिकांचा विश्वास कायम राहावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
०००००००००००
००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *