८ जूनची परिपत्रके रद्द करा – बिरू कोळेकर
ठाणे,  वसंतराव नाईक संशोधन व प्रशिक्षण संस्था (वनार्टी) यांनी ८ जून २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या विविध विद्यार्थी योजना परिपत्रकांमधील VJNT प्रवर्गाच्या जागावाटपात धनगर समाजावर (NT-C प्रवर्ग) अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचाचे राज्य संघटक, मुख्य प्रवक्ता तथा आयटी व मीडिया प्रमुख बिरू कोळेकर यांनी याबाबत इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्याकडे निवेदन सादर करून सर्व परिपत्रके तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे.
कोळेकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार, महाराष्ट्र शासनाच्या मूळ आरक्षण रचनेनुसार VJ-A – ३ टक्के, NT-B – २.५० टक्के, NT-C – ३.५० टक्के आणि NT-D – २ टक्के असे आरक्षणाचे प्रमाण आहे. या प्रमाणाचे १०० टक्क्यांमध्ये रूपांतर केल्यास VJ-A – २७ टक्के, NT-B – २३ टक्के, NT-C – ३२ टक्के आणि NT-D – १८ टक्के असे वाटप होणे अपेक्षित आहे. मात्र वनार्टीच्या परिपत्रकांमध्ये VJ-A – ४० टक्के, NT-B – २२.५० टक्के, NT-C – २२.५० टक्के आणि NT-D – १५ टक्के असे वाटप करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.शासनाच्या मूळ आरक्षण रचनेनुसार धनगर समाजाचा समावेश असलेल्या NT-C प्रवर्गाचा वाटा सर्वाधिक असताना त्याला केवळ २२.५० टक्के वाटा देण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये, स्पर्धा परीक्षा उमेदवारांमध्ये आणि युवकांमध्ये नाराजी निर्माण झाली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी करून वनार्टीने कोणत्या शासन निर्णय, कायदेशीर तरतूद अथवा धोरणाच्या आधारे हे वाटप केले, याची माहिती सार्वजनिक करावी. तसेच ८ जून २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली सर्व परिपत्रके रद्द करून महाराष्ट्र शासनाच्या मूळ आरक्षण टक्केवारीनुसार नव्याने व न्याय्य पद्धतीने जागावाटप करावे, अशी मागणी बिरू कोळेकर यांनी केली आहे.दरम्यान, या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय न झाल्यास धनगर समाजासह VJNT प्रवर्गातील विद्यार्थी, युवक आणि सामाजिक संघटनांच्या वतीने राज्यव्यापी लोकशाही आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही बिरू कोळेकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *