पुणे : पुण्यातील विषारी दारू प्रकरणात मृत्यूमुखी पडलेल्या तसेच बाधित झालेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देण्याची मागणी शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबांच्या गंभीर परिस्थितीची माहिती देत मदतीची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची विनंती केली.
डॉ. गोऱ्हे यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही या दुर्घटनेतील पीडित कुटुंबांच्या परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी संपर्क साधून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत उपलब्ध करून देण्याची विनंती केल्याचे त्यांनी सांगितले.
दुर्घटनेनंतर आपण स्वतः पीडित कुटुंबांची भेट घेऊन वैयक्तिक आर्थिक मदत केली होती, असे सांगताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, अनेक कुटुंबांतील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे महिलांवर, लहान मुलांवर आणि वृद्ध सदस्यांवर मोठे आर्थिक व सामाजिक संकट कोसळले आहे. अनेक महिलांचे शिक्षण मर्यादित असल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन उदरनिर्वाह यांची चिंता वाढली आहे.
या प्रकरणात विविध स्तरांवरून मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यात आली असली, तरी प्रत्यक्ष आर्थिक मदतीची प्रक्रिया अपेक्षित वेगाने झालेली नसल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच या संदर्भात पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांच्याशीही चर्चा करण्यात आली होती. मात्र अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सविस्तर निवेदन सादर करून पीडित कुटुंबांना तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले. विषारी दारू दुर्घटनेमुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांना आर्थिक आधार मिळावा आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने विशेष मदत करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
