एमआयडीसीची १० टक्के, तर स्टेमचीही २० टक्के पाणीकपात
मिरा -भाईंदर :पावसाने ओढ दिल्याने शहरातील नागरिकांसाठी पाणीटंचाईचे संकट आणखी गडद होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. एमआयडीसीकडून १० टक्के पाणीकपात लागू केल्यानंतर आता स्टेम प्राधिकरणानेही २० टक्के पाणीकपात जाहीर केली आहे. ही कपात २४ जूनपासून लागू होणार असून त्याचा थेट परिणाम शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार आहे. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणात सध्या केवळ २७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ३१ ऑगस्टपर्यंत उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यासाठी जलसंपदा विभागाने मे महिन्यात १० टक्के पाणीकपात लागू केली होती. त्यानुसार एमआयडीसीकडून मिरा-भाईंदरला होणारा पाणीपुरवठा महिन्यातून दोन वेळा बंद ठेवण्यात येत आहे. मात्र, यापूर्वी स्टेम प्राधिकरणाने कोणतीही कपात लागू केली नव्हती.
आता स्टेमने २० टक्के पाणीकपात जाहीर केल्याने शहरातील पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात वगळण्याची आहे. या निर्णयाविरोधात विविध राजकीय पक्षांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. महापौर डिंपल मेहता यांनी एमआयडीसी अधिकाऱ्यांची भेट घेऊन मिरा-भाईंदरला पाणीकपातीमधून मागणी केली होती. मात्र, ही मागणी प्रशासनाने फेटाळून लावली. सध्या एमआयडीसीच्या १० टक्के पाणीकपातीमुळे नागरिकांना दर ४२ तासांनी पाणीपुरवठा केला जात आहे. स्टेमच्या नव्या २० टक्के कपातीनंतर हा कालावधी ४२ तासांवरून तब्बल ५५ तासांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी अधिक हालअपेष्टा सहन कराव्या लागणार आहेत.
