मागील सात – आठ वर्षांच्या कालावधीत खर्च झालेल्या कोट्यवधी रुपयांची चौकशी करण्याची केली मागणी
ठाणे : मागील आठ वर्षांच्या कालावधीत रायला देवी तलाव आणि परिसराचे सुशोभिकरण करण्यासाठी ठाणे महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. पण या तलाव आणि परिसराची सध्याची परिस्थिती पाहता महापालिकेचा कोट्यवधी रुपयांचा निधी कुठे झिरपला आहे असा सवाल समाजसेवक आणि स्थानिक नागरिक नरेंद्र (रवी) हिवराळे यांनी प्रशासनाला विचारला आहे. पाण्यासारखा पैसा खर्चूनही रायला देवी तलाव आणि परिसराची बकाल अवस्था का आहे याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करून संबंधिंतावरी गुन्हे दाखल करण्याची मागणी हिवराळे यांनी केली आहे.
यासंदर्भात नरेंद्र (रवी) हिवराळे म्हणाले, तलाव आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी ठाणे महापालिकेने २०१९साली सुमारे साडे दहा कोटी रुपयांची निविदा काढली होती. त्यात तलावाची खोली वाढवण्याबरोबर तिथे संरक्षक भिंत बांधण्याची अट होती. पण न्यायालयीन आदेशामुळे सिमेंट काँक्रिटची भिंतीच्या ऐवजी गॅबियन वॉल बांधण्याचा निर्णय नंतर घेण्यात आला. त्यानुसार तलावाची रुंदी कमी करून केवळ केवळ अडीच बाजूला गॅबियन वॉल बांधण्यात आली. याशिवाय तलावाची खोली वाढवण्यासाठी मोठे पंप लावून त्यातील पाण्याचा उपसा करण्यात आला. हा उपसा करत असताना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे तिथे असणारे जलचर, भारतीय प्रजातीची कासवं मरण पावलीत. याशिवाय तलावाची सध्याची परिस्थिती पाहता त्याठिकाणी तलावाची खोली किती वाढवण्यात आली असा प्रश्न उपस्थित होतो आहे. या तलावात कुठल्याही प्रकारचे पक्के बांधकाम करू नयेत असे स्पष्ट निर्देश असताना त्यात सुशोभीकरणाच्या नावाखाली अर्धवट बांधकाम केलेले पहायला मिळते. या कामासाठीही नंतर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले असल्याचा आरोप नरेंद्र (रवी) हिवराळे यांनी केला. अर्धवट सुशोभीकरणामुळे तलावाच्या उत्तर दिशेला रानटी झुडपं उगवली असून त्याठिकाणी कुठल्याही वेळेला प्रेमी युगल बसलेली आढळतात. याशिवाय पश्चिम बाजूला उत्तर भारतीय. नागरिकांच्या छट पूजेकरता तात्पुरत्या छोटे पाण्याचे हौद तयार करण्यासाठी विटा आणि भुसा वापरण्यात आला होता. आता एवढे दिवस उलटून गेल्यावरही त्याठिकाणी तो भुसा तसाच पडून असल्याचे पाहायला मिळते. काही दिवसांपुर्वी त्याठिकाणी सुरक्षा रक्षक नेमण्याची मागणी स्थानिक नगरसेवकांनी महापौर शर्मिला पिंपोळलकर यांच्या कडे केली होती. ही मागणी जरी रास्त असली तरी त्याठिकाणी केवळ एकच सुरक्षा चौकी बांधण्यात आली आहे. तलावाचा एकूण परिसर पाहता त्याठिकाणी किमान पाच ते सहा सुरक्षा चौकींची आवश्यकता असल्याचे नरेंद्र मोदींनी (रवी) हिवराळे यांनी सांगितले. तलावाची सध्याची बकाल अवस्था पाहता अमृत योजनेच्या माध्यमातून मिळालेले चार कोटी रुपये, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला कोट्यवधी रुपयांचा निधी नागपूरच्या कंत्राटदाराने कुठे खर्च झाला याची चौकशी करावी अशी आग्रही मागणी नरेंद्र (रवी) हिवराळे यांनी केली आहे. मागील आठ वर्षात कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करूनही बकाल अवस्थेत असलेला रायला देवी तलाव आणि परिसर सर्वसामान्यांसाठी केव्हा खुला होणार असा सवाल नरेंद्र ( रवी) हिवराळे यांनी उपस्थित केला आहे.
