शासनाच्या योजनांचा तृतीय पंथीयांनी आवर्जुन लाभ घ्यावा – महापौर ॲड. हर्षाली चौधरी
कल्याण : शासनाच्या योजनांचा तृतीय पंथीयांनी आवर्जुन लाभ घ्यावा असे प्रतिपादन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी केले. महापालिकेतर्फे तृतीय पंथीयांना नक्कीच निश्चितच सहकार्य केले जाईल अशा शब्दात त्यांनी उपस्थितांना आश्वासित केले. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात कल्याण डोंबिवली महानगरपालिका व किन्नर अस्मिता यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी दिवसभरात आयोजित करण्यात आलेल्या किन्नर महोत्सव २०२६ या कार्यक्रमात  बोलतांना त्यांनी हे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमास आयुक्त अभिनव गोयल, सभागृह नेते वरुण पाटील, शिवसेना (उबाठा) गटनेते उमेश बोरगावकर, महापालिका सचिव किशोर शेळके, किन्नर अस्मिताच्या फाऊंडर गुरु निता केणे, प्राचार्य डॉ.लक्ष्मी त्रिपाठी, डॉ.सान्वी जेटवानी, महापालिकेच्या समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड तसेच इतर मान्यवर व्यासपीठावर  उपस्थित होते.
किन्नर समुदायाला त्यांच्या कलागुणांसाठी व्यासपीठ उपलब्ध व्हावे या दृष्टीकोनातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून किन्नर पंथीयांसाठी महापालिकेतर्फे विविध प्रकारच्या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासनाकडून किन्नर समुदायासाठी नेहमीच सकारात्मक कार्य केले जाईल असे उद्गार महापालिका आयुक्त यांनी आपल्या भाषणात काढले.  या महोत्सवाचे आयोजन करुन महापालिकेने एक चांगले पाउल उचलले आहे त्याप्रमाणे किन्नर समुदायासाठी विविध प्रशिक्षण आयोजित केल्यामुळे गुरु निता केणे यांनी महापौर व आयुक्तांचे  आभार मानले.
यावेळी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर प्राचार्य डॉ.लक्ष्मी त्रिपाठी, डॉ.सान्वी जेटवानी यांनी देखील समयोचित भाषणे केली. कार्यक्रमाच्या दुस-या सत्रात तृतीय पंथीय कलाकांरामार्फत भव्य कलाविष्काराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास तृतीय पंथ समाजातील प्रतिनिधीनी बहुसंख्येने उपस्थित राहून उर्त्स्फुर्त प्रतिसाद दिला. तृतीय पंथीयाना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांच्या कलागुणांना व्यसपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महिला व समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त कांचन गायकवाड यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *