ठाणे- दहावी पास झाल्याच्या या वळणावर तुम्हांला समता संस्कार शिबिरात जे अविस्मरणीय अनुभव व नवे मित्र – मैत्रिणी मिळाले आहेत, त्याने तुमचं पुढील आयुष्य समृद्ध होणार आहे”, असे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॅा. संजय मंगला गोपाळ यांनी ३२ व्या वार्षिक समता संस्कार शिबिराच्या समारोपात काढले.
संस्थेचे कार्यकर्ते अक्षता दंडवते, किशन सिंग बेदी, ओम गायकवाड, एनॉक कोलियार, अजय भोसले, मयूर बने यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी महत्वाच्या जबाबदाऱ्या घेऊन मेहनत केली. संस्थेचे हितचिंतक शरद जोशी, संध्या धारडे, संगीता धनुकटे, सुप्रिया कर्णिक, विनीता मोकाशी, प्रशांत पाटील, सहभागी एकलव्यांचे पालक आदिनी शिबिराला भेट देऊन मुलांचे अभिनंदन केले.
समता विचार प्रसारक संस्थेने येऊरच्या निसर्ग समृद्ध वातावरणात हे चार दिवसीय युवा विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास शिबिर आयोजित केले होते. संजय मं गो पुढे म्हणाले, “शिबिरातील स्त्री – पुरुष संबंध, मुली मुलांमधील प्रेम व आकर्षण या सत्रांमधून तुम्हाला तुमची आई, बहीण व मैत्रीण यांच्याकडे पाहण्याचा जो समतेचा दृष्टीकोन मिळाला आहे तो कधीच विसरु नका. जसं जगण्यासाठी अन्न आवश्यक असलं तरी आपण ठराविक वेळी व प्रमाणात खातो तसेच मोबाईल सोबत वागा. दिवसांची ठराविक वेळच मोबाईल हातात घ्या. त्या वेळात वर्तमानपत्र, अवांतर पुस्तकं वाचा, चांगल्या फिल्म्स पहा. आपल्या परिसरातील अनेक समस्या तुम्ही मांडल्यात. आता त्या सोडवण्यासाठी पुढाकार घ्या! आपल्या करियरविषयी अधिक पर्यायांचा विचार करा.
यावेळी शिबिरार्थींनीही मनोगतात शिबिर अनुभव अविस्मरणीय आहेत. आम्हांला खूप महत्वाचे ज्ञान शिबिरातून मिळाले, हे आवर्जून सांगितले. पालकांनीही आम्हा सामान्य परिस्थितीत जगणाऱ्यांच्या घरातील मुली – मुलांसाठी संस्था करत असलेल्या धडपडीसाठी आभार व्यक्त केले. संस्थेच्या विश्वस्त मनीषा जोशी यांनी मुलांना शिबिरात मिळालेली शिकवण लक्षात ठेऊन त्या प्रमाणे पुढे मार्गक्रमण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. संस्थेच्या सचिव लतिका सु. मो. यानी मुलांना संस्थेच्या कार्यक्रमांशी जोडून रहा असे सांगत संस्थेच्या पुस्तक पेढी उपक्रमाची माहिती दिली.
या वर्षीचे हे युवा शिबिर एकलव्य गौरव पुरस्कार प्राप्त एकलव्यांनी आणि वंचितांच्या रंगमंचाच्या कलाकारांनी उत्तम प्रतिसाद देत उत्साही वातावरणात आणि संस्थेची माजी एकलव्य दिपाली सावंत आणि संस्थेच्या विश्वस्त मीनल उत्तुरकर यांच्या संयोजनात संपन्न झालं. संस्थेच्या संस्थापनात सक्रिय असलेले बिरपाल भाल यांनी शिबिराचे उद्घाटन केले. संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी उद्घाटनाच्या सत्रात मुलांचे स्वागत करून संस्थेची माहिती दिली. या वेळी ठाणे शहरातील किसन नगर, येऊर, मानपाडा, धर्मवीर नगर या वस्तीतील विद्यार्थ्यांबरोबरच घणसोली, काल्हेर, केवणी – दिवे येथील आणि इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या शिबिरात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच त्यांची वैचारिक, सामाजिक आणि कलात्मकतेची जाणीव वाढवण्याच्या दृष्टीने खेळ, कार्यशाळा, व्याख्याने, गट – चर्चा आणि नाटिकांच्या माध्यमातून त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं. या साठी अनेक तज्ज्ञ व्यक्ती शिबिरार्थींशी संवाद करायला आले होते.
राजेंद्र बहाळकर यांनी वेगवेगळ्या खेळांच्या माध्यमातून मुलांना त्यांचा आत्मविश्वास वाढवणे, मित्र – मैत्रिणींशी निखळ मैत्रीच्या दृष्टीने खेळकरपणे समजुतीने कसे राहायचे, मोबाईल फ़ोन, सोशल माध्यमांचा प्रभावावर मात करून टेन्शन फ्री पण ध्येय गाठण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न कसे करायचे या बद्दल खूप प्रभावीपणाने दाखवले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे यांनी प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून बुवांच्या चमत्कारांमागचे वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून सांगितले. जादूटोणा, करणी, भूताखेतांच्या गोष्टींमागचा खोटेपणा प्रयोगांद्वारे उघड करून मुलांच्या विचारात बदल घडवून आणला.
आरती नाईक यांनी शरीर विज्ञानामध्ये स्त्री – पुरुषांच्या शारिरीक जडणं घडणीची शास्त्रीय माहिती दिली. वयात येताना प्रकर्षाने जाणवणाऱ्या आकर्षण, प्रेम आणि सेक्स या विषयांवरही त्यांनी शिबिरार्थींना सविस्तर माहिती दिली. मुलांनी त्यांना अनेक प्रश्न विचारत मोकळेपणाने चर्चा केली.सतीश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना पुढे घेता येऊ शकणाऱ्या विविध करियर निवडींबद्दल माहिती सांगत विद्यार्थ्यांना पडणाऱ्या प्रश्नांवर चर्चा केली.मकरंद जोशी यांनी मुलांना अल्गोरिदमची माहिती आणि महत्व समजावून सांगत ते आपल्या जीवनाच्या वेगवेगळ्या अनुभवाशी कसे निगडित आहे हे अतिशय छान समजावून सांगितले.
आसावरी जोशी यांनी कार्यशाळेच्या माध्यमातून टाकाऊतून टिकाऊ वस्तू हस्तकलेने कसा साध्य करू शकतो हे शिकवलं आणि मुलांनी त्यांच्या मार्गदर्शनात कागदाच्या वस्तू बनवल्या. सुप्रसिद्ध लेखिका, दिग्दर्शिका हर्षदा बोरकर यांनी नाट्य कार्यशाळा घेऊन मुलांना नाटक या कलेबद्दल माहिती दिली आणि त्यांचे ४ गट पाडून त्या गटांची ४ छोटी नाटकं बसवण्याची तयारी केली. मुलांनी या नाटकांची तालीम करून ती बसवली आणि शिबिराच्या समारोपाच्या कार्यक्रमात उत्तम प्रकारे सादर करून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
००००००००
