नवी मुंबई : नवी मुंबईत १ जुलैपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून ५ जुलैपासून अवघ्या पाच दिवसांत ७५२.२५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. ताशी ६० ते ७० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यांमुळे नवी मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशात अनेक ठिकाणी झाडे व फांद्या कोसळल्या, तसेच काही भागांत पाणी साचले.
महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन, उद्यान आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाची यंत्रणा २४ तास कार्यरत असून पाणी साचलेल्या ठिकाणी पाणी उपसा, नाल्यांमधील अडथळे दूर करणे, पडलेली झाडे व फांद्या हटवून वाहतूक सुरळीत करणे, तसेच धोकादायक वृक्षांची छाटणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
महापालिका मुख्यालयासह आठही विभागीय कार्यालयांमध्ये आपत्कालीन नियंत्रण कक्ष कार्यरत असून आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळही तैनात करण्यात आले आहे. अग्निशमन विभागाची पाच पथके, उद्यान विभागाची नऊ वृक्षछाटणी वाहने आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाची वाहने व कर्मचारी सातत्याने मदतकार्य करत आहेत. ३ जुलैपासून आतापर्यंत १,१६४ टनांहून अधिक हरित कचरा हटविण्यात आला आहे.
महापौर सुजाता पाटील यांनी विविध भागांची पाहणी करून मदतकार्याचा आढावा घेतला असून संपूर्ण परिस्थितीवर महापालिका प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे. नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये तसेच कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महापालिकेच्या टोल-फ्री हेल्पलाइन १८०० २२२ ३०९ किंवा १८०० २२२ ३१० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.
००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *