अनिल ठाणेकर
ठाणे : कोकणच्या अपेक्षित भविष्यासाठी पर्यावरणपूरक कृषी-औद्योगिक विकासाची दिशा निश्चित करण्याच्या उद्देशाने शनिवारी, १८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता रत्नागिरी येथील नवनिर्माण कॉलेज, एस. एम. जोशी विद्यानिकेतन, मिरजोळे येथे चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकणातील उपलब्ध नैसर्गिक संसाधने, पर्यावरणीय समतोल, स्थानिक मनुष्यबळाची कुशलता आणि शाश्वत विकासाच्या संधी यांचा सर्वंकष विचार या बैठकीत केला जाणार आहे. पर्यावरणाला पूरक अशा कृषी व ग्रामीण उद्योगांची उभारणी, स्थानिक रोजगार निर्मिती, नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन आणि विकासासाठी आवश्यक असलेल्या कृती कार्यक्रमांवर उपस्थितांमध्ये सविस्तर चर्चा होणार आहे.
या बैठकीस सुभाष वारे आणि उपेंद्र टण्णू हे प्रमुख उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. विविध क्षेत्रातील अभ्यासक, पर्यावरणप्रेमी, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते, उद्योजक तसेच विकासाच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या व्यक्तींनी या बैठकीत सहभागी होऊन आपले विचार मांडावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या बैठकीतून कोकणच्या शाश्वत, पर्यावरणपूरक आणि लोककेंद्रित विकासाचा आराखडा तयार करण्यासाठी पुढील कृती कार्यक्रम निश्चित करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक अभिजित हेगशेट्ये यांनी केले असून अधिक माहितीसाठी ९४२२०५२३१४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *