– मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार तरी कारवाई शून्य
राजीव चंदने
मुरबाड : तालुक्यातील सासणे ग्रामपंचायतीने २० लाख रुपये खर्चून आलिशान कार्यालय उभारले. पण त्या कार्यालयापर्यंत जाण्यासाठी सुरक्षित रस्ताच नाही. या बेजबाबदार कारभारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आता थेट २२ जुलै रोजी “भीक मागो आंदोलन” करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुरबाड -कर्जत महामार्गावर वसलेल्या २००० लोकसंख्येच्या सासणे गावाला दरवर्षी लाखो रुपयांचे उत्पन्न आहे. याशिवाय १5वा वित्त आयोग, स्वच्छता अभियान, रोजगार हमी, रोडलाईट, पाणी पुरवठा यासाठी शासनाकडून कोट्यवधींचा निधी येतो. मात्र तो निधी जातो कुठे, असा संतप्त सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
माजी सदस्य किरण दळवी यांनी या प्रकरणी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. त्यांच्यानुसार मुदत असलेले जुने बल्ब बदलून नवीन खरेदी दाखवली. ४5० रुपयाचा एल ए डी बल्ब २००० रुपयाला खरेदी दाखवून १ ते १.5 लाखांचा अपहार केला.
घरपट्टी, पाणी टंचाई, स्वच्छता या नावाखाली मोठी उधळपट्टी केली आहे. २० लाखाचे ऑफिस पण त्याला जोड रस्ता नाही या संदर्भात दळवी यांनी पुराव्यांसह तक्रार दिली असतानाही अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही.
“ग्रामपंचायत निधी देणार नसेल तर आम्ही भीक मागून रस्ता करू” अशी भूमिका घेत ग्रामस्थांनी सी ई ओ, जिल्हा परिषद ठाणे, तहसीलदार मुरबाड, बी. डी. ओ. मुरबाड यांना निवेदन दिले आहे. शासकीय तिजोरी लुटली आणि आता रस्त्यासाठी आम्ही भीक मागावी?” असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहेत. आता २२ जुलैच्या आंदोलनानंतर गटविकास अधिकारी काय कारवाई करतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
