निष्क्रिय महापालिका प्रशासन जबाबदार – नगरसेवक भरत चव्हाण
अनिल ठाणेकर
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रात आठ दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरपरिस्थिती, लाखो हतबल नागरिक आणि निष्क्रिय महापालिका प्रशासनामुळे जनतेच्या झालेल्या अतोनात हालाबद्दल महापालिका प्रशासनाला नागरिकांच्या वतीने जाब विचारण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी महासभेत लक्षवेधी सूचना सादर केली आहे.
ठाणे शहरातील २८ लाख नागरिकांनी मुसळधार पावसामुळे अभूतपूर्व परिस्थिती अनुभवली. ठिकठिकाणी साचलेले पाण्याबरोबरच घराबाहेर पडल्यावर किंवा सोसायटीच्या आवारात कोणत्याही क्षणी झाड कोसळून जीव जाण्याची भीती वाटत होती. शहरात अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावरील मॅनहोल व गटारावरील चेंबर उघडे असल्याच्या तक्रारी होत्या. अशा परिस्थितीत लाखो ठाणेकर जीव मुठीत घेऊन राहत होते, याकडे नगरसेवक भरत चव्हाण यांनी लक्ष वेधले आहे.
पहिल्याच पावसात नौपाड्यातील चिखलवाडी येथे पंप बंद पडला होता. शहराच्या इतर भागातही पंप असतानाही पाणी तुंबल्याचे प्रकार घडले. खाडीच्या भरतीचे कारण दाखवून नालेसफाईतील अपयश लपविण्याचा प्रयत्न करण्यात आला. गेल्या आठ दिवसांत पूरपरिस्थितीला महापालिकेने निमंत्रण दिले. मॅनहोल व गटारावरील चेंबर बंद करण्याच्या विनंतीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे सामान्य ठाणेकराचा जीव धोक्यात आला आहे, असे नगरसेवक भरत चव्हाण यांनी लक्षवेधीत म्हटले आहे.
महापालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून मोठी अपेक्षा होती. मात्र, आपत्कालीन विभाग हा पावसाचे संकट हाताळण्यास पूर्णपणे अपयशी ठरला. आपत्कालीन कक्षातील दूरध्वनी केंद्रावर तक्रार केल्यानंतर मदत मिळण्यास विलंब होत होता. या काळात महापालिका प्रशासनामध्ये समन्वय नसल्याचे निदर्शनास आले. महापालिकेच्या सर्व विभागाने एकत्रितपणे काम न करता स्वतंत्रपणे काम केले असल्याचे आढळले. आपत्कालीन नियंत्रण कक्षात तक्रार केल्यानंतर ती युद्धपातळीवर हाताळण्यासाठी मर्यादा येत असल्याचे दिसून आले.
महापालिकेत लोकप्रतिनिधींची राजवट आल्यानंतर नालेसफाई, पाण्याचा निचरा होण्यासाठी पंप आदी निविदांना एकमताने मंजुरी देण्यात आली होती. परंतु, मुसळधार पावसाच्या काळात ठाण्यातील नागरिकांना सुविधा मिळाल्या नाहीत, ही खंत वाटते. मात्र, अग्निशमन दलाने अपुरे मनुष्यबळ असूनही लक्षणीय कामगिरी केली होती, हा आशेचा किरण आहे, असे भरत चव्हाण यांनी लक्षवेधी सूचनेत म्हटले आहे.
चौकट
शहरातील रस्त्याच्या दुतर्फा अजूनही फांद्या व पडलेली झाडे !
ठाणे शहरात झाडे व झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या. मात्र, रस्त्यावर पडलेल्या फांद्या उचलण्यासाठी महापालिका व वृक्ष प्राधिकरणाची यंत्रणा कार्यान्वित नव्हती. त्यामुळे शहरातील प्रत्येक रस्त्यावर झाडाच्या फांद्या पडून असल्याचे चित्र पाहावयास मिळाले, असे भरत चव्हाण यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *