काँग्रेसचा भाजपला सवाल!
अनिल ठाणेकर
ठाणे, राम मंदिराच्या मुद्द्यावर सातत्याने राजकीय भूमिका घेणाऱ्या भाजपलाच आता अयोध्येतील श्रीराम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या आरोपांवर काँग्रेसने घेरण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यव्यापी ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह आंदोलनाअंतर्गत शुक्रवारी ठाण्यातील ऐतिहासिक कौपिनेश्वर मंदिर परिसरात काँग्रेसने आंदोलन करत या कथित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या निर्देशानुसार ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. सकाळी शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते कौपिनेश्वर मंदिर परिसरातील राम मंदिरात एकत्र आले. पांढऱ्या टोप्या परिधान करून त्यांनी ‘रघुपती राघव राजाराम’, ‘खरा तो एकचि धर्म’ आणि ‘पसायदान’चे सामूहिक गायन करत शांततापूर्ण सत्याग्रह केला.
यावेळी कार्यकर्त्यांनी भक्तांच्या श्रद्धेवर केला हल्ला… रामाच्या दानपेटीवर मारला डल्ला… तसेच राम नाम जपना, पराया माल अपना… अशा आशयाचे फलक झळकावत निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान “रामाच्या नावावर राजकारण करणारेच आता कथित दान गैरव्यवहारावर मौन का बाळगत आहेत? असा सवालही उपस्थित करण्यात आला. यावेळी बोलताना राहुल पिंगळे यांनी, रामाच्या आणि धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी या कथित प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी केली. या कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
या आंदोलनात ठाणे काँग्रेस चे अध्यक्ष राहुल पिंगळे यांच्यासह प्रदेश पदाधिकारी गजानन देसाई,मधू मोहिते,विश्वास उटगी,राजेश जाधव शीतल आहेर,मिलिंद खराडे ,सेवादलाचे अध्यक्ष रवी कोळी ,उमेश कांबळे,विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी डॉ संजय मंगो, वंदना शिंदे, जगदीश खैरालिया, मिलन उत्तुरकर , राजेंद्र चव्हाण,सतीश जाधव ब्लॉक अध्यक्ष आनंद सांगळे,राजू शेट्टी,अंजनी सिंग,संगीता कोटल, शांती इलावडेकर, हर्षद ठाकूर,अजिंक्य भोईर प्रवीण खैरालिया,सुरेश भोईर,मार्शल पन्हाळकर स्वप्निल कोळी, विश्वनाथ किरकिरे,दरम्यानसिंग बिष्ट,दयानंद एगडे, राम भोसले, सुरेश खेडे पाटील,रवींद्र आंग्रे,रमेश पाटील,नंदकुमार गावसकर,बाबू यादव,अशोक नळवाला,मीना कांबळे,सुप्रिया पाटील,रजनी पांडे,मुन्ना राजोरिया, मनोज दुबे,चंद्रकांत पाटील,स्वप्निल भोईर,राजेश मिश्रा,पप्पू सिंग,लोकेश घोलप,शिरीष घरत,प्रसाद पाटील,राकेश पुर्णेकर,सोनिया पंजाबी, अकिंदर टमाटा, कौस्तुभ गाडगीळ, यांच्या सह सर्व स्तरातील पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. आंदोलन शांततेत पार पडले.
०००००००००
