मुंबई विद्यापीठाने भूमिका स्पष्ट करावी – मनविसे
राजेंद्र साळसकर
मुंबई : मुंबई विद्यापीठाने प्रा. डॉ. किशोर गायकवाड यांच्या समितीने सुमारे पाच वर्षांपूर्वी सादर केलेल्या कथित वाङ्मयचौर्य (Plagiarism) प्रकरणातील चौकशी अहवाल, दोषनिश्चिती व त्यानंतर झालेल्या शिस्तभंगात्मक कारवाईबाबत आजपर्यंत कोणतीही स्पष्ट माहिती सार्वजनिक केलेली नाही. या विलंबामुळे शैक्षणिक प्रामाणिकता, पारदर्शकता आणि संशोधनाच्या विश्वासार्हतेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (मनविसे) राज्य सरचिटणीस ॲड. संतोष गांगुर्ड यांनी केला आहे. मनविसेच्या मते, या प्रकरणात विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांनी आजपर्यंत कोणती भूमिका घेतली, चौकशी अहवाल अद्याप का जाहीर करण्यात आलेला नाही, चौकशी पूर्ण झाली असल्यास तो सार्वजनिक का करण्यात येत नाही आणि चौकशी प्रलंबित असल्यास त्यास जबाबदार कोण, याबाबत विद्यापीठाने तातडीने स्पष्टीकरण द्यावे.
यासंदर्भात मनविसेने मुंबई विद्यापीठाकडे पुढील प्रश्न उपस्थित केले आहेत—
१) प्रा. संदेश वाघ यांच्या कथित वाङ्मयचौर्य प्रकरणातील चौकशीची सद्यस्थिती काय आहे?
२). संस्थात्मक शैक्षणिक प्रामाणिकता समिती (Institutional Academic Integrity Panel) व संबंधित प्राधिकरणाने या प्रकरणात कोणते निष्कर्ष नोंदविले आहेत?
३)संबंधित प्रकरणात कोणती शिस्तभंगात्मक अथवा प्रशासकीय कारवाई करण्यात आली आहे?
४) चौकशी अहवाल सार्वजनिक करण्यास कोणता कायदेशीर किंवा प्रशासकीय अडथळा आहे?
याबाबत समाधानकारक खुलासा व आवश्यक कारवाई न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना विद्यापीठ अनुदान आयोगाकडे (UGC) अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचा इशाराही मनविसेने दिला आहे.
मुंबई विद्यापीठ हे राज्यातील सर्वोच्च शैक्षणिक संस्थांपैकी एक असल्याने वाङ्मयचौर्यासारख्या गंभीर प्रकरणांमध्ये मौन बाळगण्याऐवजी पारदर्शक, उत्तरदायी आणि कायदेशीर भूमिका घेणे ही विद्यापीठाची जबाबदारी असल्याचे मनविसेने स्पष्ट केले आहे.
कोट
“यूजीसीच्या वाङ्मयचौर्य प्रतिबंध नियमावलीनुसार विद्यापीठाच्या प्र-कुलगुरू डॉ अजय भामरे द्वारे ४५ दिवसाच्या आत अहवाल जाहीर करायचा असताना देखील, पाच वर्ष उलटून अद्यापही अहवाल जाहीर न करने व तसेच माहितीच्या अधिकारात अहवाला बद्दल माहितीला नकार देणे यावरून वाङ्मयचौर्य प्राध्यापकांना विद्यापीठ बळ देऊन गुन्हेगारी कृत्य करत असल्याचे सिद्ध होत आहे”.
-आयु. गांगुर्डे संतोष
(राज्य सरचिटणीस: मनसे विद्यार्थी सेना )
