00000
अनिल ठाणेकर
ठाणे : महापालिकेत चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीप्रमाणे कारभार सुरू असून, महापालिका अधिकाऱ्यांच्या अनास्थेचा फटका २८ लाख ठाणेकरांना बसला. पावसाच्या काळात झाडाच्या पडलेल्या फांद्या वेळीच उचलल्या न गेल्यामुळे कोपरीत साथीच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक भरत चव्हाण यांनी महासभेत केला. तसेच पावसाळ्याच्या काळात अग्निशमन, घनकचरा, सार्वजनिक बांधकाम आणि आपत्कालीन विभागाने एकत्रितपणे समन्वयाने काम करावे, अशी मागणी भरत चव्हाण यांनी केली.
जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक भरत चव्हाण यांनी महासभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. पावसाळा लांबल्यानंतर महापालिकेने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याची अपेक्षा होती. परंतु, पहिल्याच पावसात मोठ्या संख्येने झाडे पडण्याबरोबरच पूरस्थिती निर्माण झाली. त्यानंतर आपत्कालीन विभागाचा बोजवारा उडाल्याचे ठाणेकरांनी पाहिले. वृक्ष प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांकडून अर्धे काम कोपरीत, तर अर्धे काम तीन हात नाका येथे सुरू होते. चेंदणी कोळीवाड्याजवळ रेल्वे बोगद्याखाली सातत्याने पाणी साचत असल्याची तक्रार केल्यावर, एसटीपी विभाग व सार्वजनिक बांधकाम विभाग एकमेकांवर जबाबदारी ढकलत होते. अशा परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या सामान्य ठाणेकरांनी कोणाकडे दाद मागायची, असा सवाल नगरसेवक भरत चव्हाण यांनी केला. कोपरीमध्ये स्वच्छता निरीक्षकांच्या माध्यमातून दुसऱ्या दिवशी झाडाच्या पडलेल्या फांद्या उचलल्या जातात. तो कोपरी पॅटर्न ठाणे शहरात लागू करावा, अशी सूचना भरत चव्हाण यांनी केली.
कोपरीहून पटणी पूलापर्यंत पूल उभारण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. परंतु, भूमाफियांकडून सर्रास अतिक्रमणे करून खाडी बुजूवूचाळी उभारल्या जात आहेत. त्यामुळे काही वर्षांनंतर पूल उभारण्याची गरजही लागणार नाही, असा टोला भरत चव्हाण यांनी लगावला. ठाण्यात होणाऱ्या वाहतूककोंडीच्या पार्श्वभूमीवर, महापालिकेने पोलिसांच्या वाहतूक विभागात ट्रॅफिक वॉर्डन उपलब्ध केले आहेत. मात्र, आजही अनेक भागातील वाहतूककोंडी अधिक भीषण होत आहे. दहा मिनिटांच्या प्रवासासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. वाहतूक कोंडीत शाळांमधील मुले अडकत आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने वाहतूक पोलिसांबरोबर समन्वय साधून कार्य करावे, अशी सूचना नगरसेवक भरत चव्हाण यांनी केली.
मॅरेथॉनच्या प्रतिकाचा पुतळा गायब
ठाणे शहराला मॅरेथॉनचा इतिहास आहे. मॅरेथॉननिमित्ताने कोपरीत तीन फूटांचा आकर्षक पुतळा उभारण्यात आला होता. मात्र, तो मुसळधार पावसानंतर गायब झाला आहे. त्याच्या चोरीबाबत महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना काहीही माहिती नाही, याकडेही नगरसेवक भरत चव्हाण यांनी लक्ष वेधले.
00000000000
