कोंडी व अपघातांवर उपाययोजना
नगरसेवक बाबाजी पाटील यांच्या पाठपुराव्याला यश
आरती परब
दिवा: शिळफाटा-कल्याणफाटा परिसरातील वाढती वाहतूक कोंडी आणि वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर अखेर या दोन्ही महत्त्वाच्या चौकात वाहतूक सिग्नल यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामास मंजुरी मिळाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिळफाटा- कल्याण फाटा चौकात वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ होत असून, वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत होती. याबाबत स्थानिक नागरिक, सामाजिक संस्था आणि वाहनचालकांकडून सातत्याने सिग्नल बसविण्याची मागणी केली जात होती.
प्रभाग क्रमांक २९ चे नगरसेवक बाबाजी पाटील यांनी या प्रश्नाबाबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे, ठाणे महानगरपालिका, वाहतूक विभाग आणि एमएसआरडीसीकडे सातत्याने पाठपुरावा केला. तसेच नगरसेविका अर्चना पाटील व नगरसेविका वेदिका पाटील यांनीही या मागणीसाठी प्रयत्न केले.
जून महिन्यात झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या महासभेतही हा विषय उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महापालिका आयुक्त सौरव राव यांच्यासोबत बैठक घेऊन आवश्यक सूचना दिल्या, तर आमदार राजेश मोरे यांनीही संबंधित विभागांशी समन्वय साधून या कामाला गती दिली.
महापालिकेच्या वतीने आता सिग्नल यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक केबल टाकणे, खांब उभारणे आणि तांत्रिक कामे लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. सिग्नल कार्यान्वित झाल्यानंतर वाहतूक अधिक शिस्तबद्ध होण्यास मदत होईल तसेच अपघातांचे प्रमाण कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे परिसरातील नागरिकांकडून स्वागत करण्यात येत असून, वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
००००००००
