१२५ हून अधिक नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याचा दावा
कल्याण : कल्याण पश्चिमेतील संदीप हॉटेल परिसर ते खडकपाडा परिसरातील एका रस्त्यावर भटक्या कुत्र्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भटक्या कुत्र्याने तब्बल १२५ ते १५० नागरिकांना चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये मोठी भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक आणि  गटनेते उमेश बोरगावकर आपल्या कार्यकर्त्यांसह रस्त्यावर उतरले.विशेष म्हणजे, भटक्या कुत्र्याचा शोध घेण्यासाठी खडकपाडा पोलीस आणि महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारीही रात्रभर परिसरात फिरत होते.
अखेर रात्री या कुत्र्याला पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने या भटक्या कुत्र्याला पकडला आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी केडीएमसी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून वारंवार करण्यात येत आहे. मात्र, आता मोठ्या संख्येने नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याची घटना समोर आल्याने प्रशासनाच्या कारभाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या घटनेमुळे संदीप हॉटेल ते खडकपाडा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
रविवारी दुपारपासून हा भटका कुत्रा गाडीवर बसलेल्या, चालणाऱ्या नागरिकांना पाठीमागून येऊन चावण्याच्या तक्रारी आहेत. अचानक वाढलेल्या श्वानदंशाच्या घटनांमुळे अनेक नागरिकांनी उपचारासाठी महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाकडे धाव घेतली. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयात एका दिवसात १३० नागरिक श्वानदंशाच्या उपचारासाठी आले. त्यापैकी गंभीर स्वरूपाच्या जखमा झालेल्या २५ नागरिकांना रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले. या घटनेतील ११ वर्षीय मुलीवर अधिक उपचारांची आवश्यकता असल्याने तिला मुंबईतील शीव रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर अन्य रुग्णांवर आवश्यक उपचार करून त्यांना अँटी-रेबीज लस देण्यात आली.
रविवारच्या घटनेनंतर सोमवारी कल्याण रेल्वे स्थानक परिसरात भटक्या श्वानाची दहशत पाहायला मिळाली. याठिकाणी १० ते १५ प्रवाशांना चावा घेतला.  रुग्णालयात औषधांचे सॅम्पल दाखविण्यासाठी आलेला सेल्स मॅनेजरच भटक्या कुत्र्याची शिकार ठरला असून रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या आवारातच फार्मा कंपनीच्या सेल्स मॅनेजर अतुल सिंग यांना श्वानदंश झाला. सलग दुसऱ्या दिवशी श्वानाच्या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
तर भटक्या कुत्र्यांच्या दहशतीनंतर केडीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले असून केडीएमसी  आयुक्त आणि महापौरांकडून डॉग सेंटरची पाहणी करण्यात आली. कल्याणमधील खडकपाडा आणि रेल्वे स्टेशन परिसरात भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेतल्याच्या घटनांनंतर अखेर केडीएमसी प्रशासन खडबडून जागे झाले आहे. आयुक्त अभिनव गोयल आणि महापौर हर्षाली चौधरी यांनी कल्याणमधील डॉग सेंटरची पाहणी केली. डॉग सेंटरचे सुरू असलेले बांधकाम मंगळवारपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणासह कुत्र्यांना पकडण्यासाठी मोठी मोहीम राबवण्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याचा आकडा कमी सांगितल्याचा मुद्दा समोर आल्यानंतर आयुक्तांनी हा आकडा पुन्हा व्हेरिफाय करण्याचे मान्य केले आहे.
तर रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या मुख्य वैदयकीय अधिकारी कल्याण यांनी दिलेल्या अहवालानुसार रविवारी रुक्मिणीबाई रुग्णालयात एकुण 58 नागरीकांना कुत्रा चावल्याने रुग्ण उपचाराकरिता आले. त्यापैंकी, 17 नागरीकांना संदीप हॉटेल बिर्ला कॉलेज परिसरात कुत्र्याने चावा घेतल्याचे निदर्शनास आलेले आहे. या रुग्णांना महानगरपालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालयात, वैद्यकीय तपासणी करून आवश्यकतेनुसार अँटी-रेबीज लस व इतर आवश्यक उपचार करण्यात आले आहेत. सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
संबंधित रुग्णांना आवश्यक पुढील डोस व वैद्यकीय मार्गदर्शन देण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत आवश्यक कार्यवाही करण्यात येत असून त्यातील संशयातील कुत्र्याला पकडले आहे. या परिसरात भटक्या कुत्र्यांबाबत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित पशुवैदयकीय विभागास देण्यात आल्या आहेत.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *