कल्याण : १५ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी डोंबिवलीत भव्य तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारातून डोंबिवली शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थांच्या सहभागाने ही रॅली आयोजित करण्यात आली आहे.
स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यासोबतच राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशभक्तीची भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे. या तिरंगा रॅलीमध्ये शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच हजारो नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे.
डोंबिवली पूर्वेकडील टिळक चौक, सर्वेश हॉल, ब्राम्हण सभा, फडके रोड, पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पुढे दत्तनगर चौक येथे रॅली असा मार्ग असणार आहे. या रॅलीत सहभाग घ्यावा असे आवाहन पै फ्रेंड्स लायब्ररिचे पुंडलिक पै यांनी पत्रकार परिषद केले. या पत्रकार परिषदेत शिवसेना आमदार राजेश मोरे, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, विंदा भुस्कुटे, माजी मुख्यध्यापिका दीपाली काळे, पदश्री गजानन माने, सागर जेधे, विवेक खामकर यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
00000
