मुंबई : १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित करण्यात आलेला आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचणारा श्री समर्थ रामदास स्वामी यांची शिकवण समाजासमोर आणणारा मराठी चित्रपट ‘समर्थ’ ला केवळ दाक्षिणात्य चित्रपटासाठी चित्रपटगृह नाकारण्यात आले. यामुळे मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कडे साकडे घालण्यात आले आहे. ‘समर्थ’ चित्रपटाची कथा संकल्पना साकार करणारे निर्माते रवींद्र पाठक यांनी या संदर्भात आपली कैफियत मांडतांना सांगितले की, १४ ऑगस्ट रोजी समर्थ हा समर्थ रामदास स्वामी यांनी केलेल्या समाजप्रबोधनाचे विचार समाजासमोर आणण्यासाठी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. याचवेळी दोन मोठे बहुचर्चित हिंदी चित्रपट प्रदर्शित झाले. परंतु समर्थ चित्रपट लोकप्रियता मिळवू लागला. सुमारे दहा हजार विद्यार्थी विद्यार्थिनींनी हा चित्रपट पाहिला. विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या साठी आम्ही हा चित्रपट सवलतीच्या दरात दाखविले. आणखीही काही शाळांमधील विद्यार्थ्यांनी/विद्यार्थिनींनी हा चित्रपट पाहण्यासाठी तयारी दाखविली. त्याचवेळी एक दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला आणि समर्थ या मराठी चित्रपटाला अनेक ठिकाणी प्रयत्न करुनही चित्रपटगृह नाकारण्यात आले. दाक्षिणात्य चित्रपट जी कमाई आम्हाला मिळवून देणार आहे ती कमाई आम्हाला समर्थ चित्रपट लावून मिळणार नाही, मग आमचे नुकसान कोण भरुन देणार ? असे उर्मटपणे उत्तर ऐकायला मिळते. या चित्रपटाला सर्व चित्रपट समीक्षकांनी दर्जेदार म्हणून गौरविले आहे. अशा परिस्थितीत जर मराठी चित्रपटाला चित्रपटगृह नाकारण्यात येत असतील तर काय होणार? असा उद्विग्न सवालही समर्थ चे निर्माते रवींद्र पाठक यांनी केला आहे. शंकर महादेवन, पंडित संजीव अभ्यंकर, आर्या आंबेकर, जयदीप वैद्य, अनिरुद्ध जोशी, रोहित राऊत यांनी गीते गायली असून केदार पंडित आणि रोहित राऊत हे संगीत दिग्दर्शक तर आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. क्रिएटिव्ह प्रोड्युसर अमोल भगत आणि दिग्दर्शक योगेश फुलफगर आहेत.
0000
