मुंबई : अशोक गायकवाड ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कामांची संख्या वाढवून मंजूर कामांच्या अंमलबजावणीला गती द्यावी, असे निर्देश रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी दिले. पात्र नागरिकांना कामाची कमतरता भासू नये, यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. योजनेच्या राज्यातील अंमलबजावणीचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री गोगावले यांनी जिल्हानिहाय प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी रोजगार हमी विभागाचे सचिव आप्पासो धुळाज यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) तसेच जिल्हास्तरीय अधिकारी ऑनलाइन बैठकीत सहभागी झाले होते. नंदुरबार जिल्ह्याच्या उल्लेखनीय कामगिरीचे मंत्री गोगावले यांनी विशेष कौतुक केले. अहिल्यानगर, यवतमाळ, नाशिक, चंद्रपूर, जळगाव, अमरावती, नांदेड, बुलढाणा, लातूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या कामगिरीबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले. कमी कामे सुरू असलेल्या जिल्ह्यांनी तातडीने रोजगाराच्या संधी वाढवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले. योजनेअंतर्गत आता ३१८ प्रकारची कामे घेता येणार असून घरकुले, शाळांच्या कंपाऊंड भिंती, स्वच्छतागृहे, जलसंधारण, सिंचन विहिरी आणि आपत्ती निवारणाच्या कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे. मजुरांना वेळेत मजुरी मिळणे आवश्यक असून निधी उपलब्ध असतानाही मजुरी प्रलंबित राहिल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मंत्री गोगावले यांनी दिला. तसेच ई-केवायसी पूर्ण करूनच मजुरांना काम देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पीएमएवाय-२ अंतर्गत राज्याला सुमारे २० लाख घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले असून जिल्हानिहाय वाटप लवकरच करण्यात येणार आहे. केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या सुमारे २,८५० कोटी रुपयांच्या निधी साठी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. प्रत्येक ग्रामपंचायतीने पुढील पाच वर्षांचा विकसित ग्रामपंचायत आराखडा तयार करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवावा. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गाव पातळीवर जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधावा, असे निर्देशही मंत्री गोगावले यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *