स्मृतिदिनाचे औचित्य साधत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गीताचे अनावरण
अनिल ठाणेकर
ठाणे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधत त्यांच्या कार्याला आणि विचारांना सुरांची आदरांजली वाहणारे ‘हा धर्मवीर ठाण्याचा…’ हे गीत साकारण्यात आले असून, या गीताचे अनावरण शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी यावेळी खासदार नरेश मस्के, ठाणे महापौर शर्मिला पिंपळोलकर, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे, शिवसेना गटनेते पवन कदम, शिवसेना लातूर जिल्हा प्रमुख सचिन दाने,सदाशिव गव्हाणे उपजिल्हाप्रमुख,अंकुश नाना कुंभार शहरप्रमुख, सतीश पाटील संघटक, बालाजी पवार, गट प्रमुख भगवान शिंदे, शुभम लोखंडे युवासैनिक, नितीन कांबळे, विशाल कोल्हे.व सर्व लातूर जिल्ह्यातील शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.
ठाण्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनावर आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे धर्मवीर आनंद दिघे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळखले जात. सामान्य नागरिकांशी असलेला जिव्हाळा, सामाजिक कार्य, हिंदुत्वाची भूमिका आणि शिवसेनेच्या संघटनात्मक विस्तारासाठी त्यांनी केलेले कार्य आजही शिवसैनिकांसाठी प्रेरणादायी मानले जाते. दिघे साहेबांच्या याच कार्याची आणि विचारांची आठवण करून देण्यासाठी त्यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने हे गीत तयार करण्यात आले आहे.
शिवसेना लातूर जिल्हाप्रमुख सचिन दाणे यांच्या संकल्पनेतून ‘हा धर्मवीर ठाण्याचा…’ या गीताची निर्मिती करण्यात आली आहे. दिघे साहेबांच्या कार्याचा वारसा आणि त्यांच्या विचारांची प्रेरणा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या गीतातून करण्यात आला आहे. भगव्याचा स्वाभिमान, शिवसेनेची निष्ठा आणि दिघे साहेबांप्रती असलेली शिवसैनिकांची भावना या गीतातून व्यक्त करण्यात आली आहे.
या गीताला विक्रम कोतवाड यांनी आवाज दिला असून विनायक राठोड यांनी संगीतबद्ध केले आहे. गीतलेखन महादेव ढमने यांनी केले असून, व्ही ट्यून्स संगीत स्टुडिओ, लातूर येथे संगीतनिर्मिती करण्यात आली आहे. या उपक्रमाला शिवसेना सचिव संजय मोरे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
‘हा धर्मवीर ठाण्याचा…’ हे गीत लवकरच स्पॉटिफाय, जिओसावन आणि यूट्यूब म्युझिक यांसह विविध डिजिटल व्यासपीठांवर प्रदर्शित होणार आहे. दिघे साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त साकारण्यात आलेले हे गीत त्यांच्या कार्याला वाहिलेली भावपूर्ण संगीतात्मक आदरांजली ठरणार असून, त्यांच्या आठवणी आणि विचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे माध्यम ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
