रमेश औताडे
मुंबई : देशातील कर्करोगाच्या रुग्णसंख्येत ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण लक्षणीय वाढ झाली असून प्रत्येक रुग्णासाठी एकसारखी उपचार पद्धती योग्य ठरत नाही. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये वाढते वय, इतर आजार, शारीरिक क्षमता, मानसिक आरोग्य, पोषणाची स्थिती आणि सामाजिक आधार यांचा विचार करून उपचाराचे नियोजन करणे आवश्यक ठरते. असे मत अपोलो हॉस्पिटल चे डॉक्टर तेजंदर सिंह यांनी व्यक्त केले.
वाढत्या वयाबरोबर कर्करोगाचा धोका वाढत असला तरी प्रत्येक ज्येष्ठ रुग्णाची उपचार सहन करण्याची क्षमता वेगवेगळी असते. काही ज्येष्ठ व्यक्ती शारीरिकदृष्ट्या सक्षम असतात, तर काहींना आधीपासून मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, अशक्तपणा किंवा अन्य आजारांचा सामना करावा लागत असतो.अशा परिस्थितीत केवळ कर्करोगाचा प्रकार आणि त्याची अवस्था पाहून उपचार ठरवणे पुरेसे ठरत नाही. रुग्णाची दैनंदिन कामे करण्याची क्षमता, आहार, मानसिक स्थिती, कुटुंबाचा आधार आणि आर्थिक परिस्थिती यांचाही उपचाराच्या निर्णयात विचार होणे गरजेचे आहे.
ज्येष्ठ नागरिकांमध्ये कर्करोगाचे उपचार करताना ‘कमी उपचार म्हणजे चांगले उपचार’ असा सरसकट दृष्टिकोनही योग्य नाही. रुग्णाची एकूण प्रकृती आणि उपचार सहन करण्याची क्षमता लक्षात घेऊन आवश्यक ते उपचार देणे महत्त्वाचे आहे. काही रुग्णांना शस्त्रक्रिया, केमोथेरपी किंवा रेडिएशन उपचारांची गरज असू शकते; तर काही रुग्णांमध्ये उपचारांचे स्वरूप आणि तीव्रता त्यांच्या प्रकृतीनुसार बदलावी लागू शकते.
