८ महिन्यांत ११ लाचखोर जाळ्यात!

महसूल विभाग आघाडीवर; मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस उपनिरीक्षकांसह अभियंता अन् वैद्यकीय अधिकारीही कारवाईच्या कचाट्यात

अशोक गायकवाड

रत्नागिरी : सरकारी कार्यालयात कामासाठी गेलेल्या नागरिकाची अडवणूक करून ‘चिरीमिरी’ मागणाऱ्या लाचखोरांना रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चांगलाच दणका दिला आहे. पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी ते ऑगस्ट या अवघ्या आठ महिन्यांत आठ सापळा कारवायांमध्ये एका खासगी मध्यस्थासह तब्बल ११ जणांना एसीबीच्या जाळ्यात पकडण्यात आले. या कारवाईमुळे शासकीय यंत्रणेत खळबळ उडाली आहे. एसीबीच्या कारवाईत महसूल विभाग सर्वाधिक रडारवर आला आहे. महसूल विभागातील पाच प्रकरणांत तीन मंडळ अधिकारी, दोन तलाठी आणि एका कोतवालासह सहा जणांवर कारवाई झाली. पोलीस प्रशासनातील एका पोलीस उपनिरीक्षकासह खासगी इसमाला, पाटबंधारे विभागातील कार्यकारी अभियंता व लिपिकाला, तर आरोग्य विभागातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याला लाचखोरीच्या प्रकरणात कारवाईला सामोरे जावे लागले. ‘काम करून देतो, पण आधी…’ म्हणणाऱ्यांना इशारा! कायदेशीर कामासाठी नागरिकांना विनाकारण हेलपाटे मारायला लावून लाचेची मागणी करणाऱ्यांविरुद्ध थेट एसीबीकडे तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लाच मागणे आणि लाच देणे, दोन्ही कायद्याने गुन्हे आहेत. त्यामुळे ‘काम अडेल’ या भीतीने लाच देण्याऐवजी नागरिकांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन एसीबीने केले आहे. लाच मागितल्यास शक्य असल्यास ऑडिओ-व्हिडिओ पुरावा सुरक्षित ठेवून एसीबीकडे तक्रार करता येते. भ्रष्टाचाराविरोधातील लढ्यात नागरिकांचे सहकार्य निर्णायक ठरणार आहे, असे पोलीस उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी सांगितले. तक्रारीसाठी : १०६४ | व्हॉट्सॲप : ७०३८३९१०६४ | दूरध्वनी : ०२३५२-२२२८९३ १५ आॕगस्ट ला पालकमंत्री डॉ.उदय सामंत यांनी एसीबी उपअधीक्षक अविनाश पाटील यांचा विशेष कामगिरीसाठी सत्कार करताना.

00000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *