– २०,७०० कोटींच्या ३२६ किमी मालवाहतूक मार्गिकेच्या तीन टप्प्यांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते राष्ट्रार्पण
अशोक गायकवाड
अलिबाग : जेएनपीटीला पश्चिम समर्पित मालवाहतूक रेल्वे मार्गिकेची जोड मिळाल्याने रायगडच्या बंदर, उद्योग आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. २० हजार ७०० कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या ३२६ किमी मार्गिकेच्या तीन महत्त्वपूर्ण टप्प्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे डबल-स्टॅक कंटेनर मालगाडीला हिरवा झेंडा दाखविला. “एका मालगाडीतून २५० पेक्षा अधिक ट्रकइतका माल वाहून नेता येणार असून, मालवाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी होईल,” असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. रस्त्याने सुमारे ३० तास लागणारा प्रवास रेल्वेमार्गे १० ते १२ तासांत पूर्ण होऊ शकतो. दररोज ४३० हून अधिक मालगाड्या धावण्याची क्षमता निर्माण होणार असल्याने उरण-जेएनपीटी परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच लॉजिस्टिक्स व्यवसायाला वेग मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जेएनपीटीने एप्रिल ते ऑगस्टदरम्यान हाताळलेल्या ३८.२७ लाख टीईयू कंटेनरचा संदर्भ देत २०३० पर्यंत जेएनपीटी हे दशलक्ष टीईयूपेक्षा अधिक क्षमता असलेले देशातील पहिले बंदर ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. जेएनपीटीच्या विस्तारासाठी वाढवण बंदर विकसित होत असल्याने रायगडच्या सागरी अर्थव्यवस्थेला आणखी बळ मिळणार आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी संपूर्ण समर्पित मालवाहतूक मार्गिका नेटवर्क पूर्ण होणे ही ऐतिहासिक उपलब्धी असल्याचे सांगितले. महाराष्ट्रातून सुमारे १७८ मार्ग किलोमीटरचा मार्ग जात असून रायगड, ठाणे आणि पालघरला त्याचा थेट फायदा होणार आहे. या मार्गिकेमुळे औद्योगिक मालासोबतच फळे, भाजीपाला, फुले यांसारखा नाशवंत शेतमालही मोठ्या बाजारपेठांपर्यंत वेगाने पोहोचण्यास मदत होणार आहे. बंदराभोवती लॉजिस्टिक्स, गोदामे, वाहतूक आणि पूरक उद्योग वाढण्यासह रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा आहे. उरण येथील जेएनपीएतील कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, पालकमंत्री भरतशेठ गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, आमदार प्रशांत ठाकूर व महेश बालदी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, नगराध्यक्षा भावना घाणेकर, राज्यपालांचे विशेष कार्य अधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जपानच्या मुंबईस्थित वाणिज्य दूतावासाच्या महावाणिज्य दूत सातो हितोमी, डीएफसीसीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कुमार, विभागीय आयुक्त रूबल अगरवाल, जिल्हाधिकारी किशन जावळे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, मध्य रेल्वेचे महाप्रबंधक राजीव श्रीवास्तव आणि प्रांताधिकारी पवन चांडक आदी उपस्थित होते.
