आधारवाडी रोड ते वाडेघर चौक रस्त्याच्या कामावर माजी नगरसेवकांचा आरोप
कल्याण : कल्याण पश्चिमेतील आधारवाडी रोड ते वाडेघर चौक या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामावरून माजी नगरसेवक तथा शिवसेना उपशहर प्रमुख मोहन उगले यांनी महापालिका प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. पावसामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्यानंतर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासह डांबरीकरणाची कामे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, या कामात दर्जा आणि गुणवत्तेची पायमल्ली होत असल्याचा आरोप उगले यांनी केला आहे.
पावसाने काहीशी उघडीप मिळाल्यानंतर आधारवाडी रोड ते वाडेघर चौक या रस्त्यावर डागडुजी आणि डांबरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. मात्र, रस्त्यावर साचलेल्या पाण्यातच खडीमिश्रित डांबराचे मिश्रण टाकून काम करण्यात येत असल्याचा आरोप मोहन उगले यांनी केला आहे. तसेच डांबराचे आवश्यक तापमानही राखले जात नसल्याने या कामाचा दर्जा आणि गुणवत्ता कशी टिकणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
काम सुरू असताना संबंधित महापालिका अधिकारी प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित नसल्याचा आरोपही उगले यांनी केला. त्यामुळे ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीने निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रस्त्यालगत असलेले डेब्रिज, चिखल आणि खड्डेही अद्याप कायम असल्याने केवळ थातुरमातुर डागडुजी करून काम पूर्ण केल्याचा दिखावा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांची डागडुजी करण्याची घाई असली तरी कामाचा दर्जा आणि नागरिकांची सुरक्षितता याकडे दुर्लक्ष होता कामा नये, असे उगले यांनी सांगितले. संबंधित कामाची पाहणी करून दर्जाहीन काम करणाऱ्या ठेकेदारासह संबंधित महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आपण महापालिका आयुक्तांकडे करणार असल्याचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात कार्यकारी अभियंता संदीप तांबे तसेच उप अभियंता सुनील पाटील यांच्याशी भम्रणधव्नीवरून संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.
00000
