विवेक पंडित यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
योगेश चांदेकर
पालघर :  जिल्हा परिषद शाळांची पुन्हा पुन्हा पाहणी आणि माहिती संकलन करण्याऐवजी प्रत्येक शाळेतील शिक्षक व मूलभूत सुविधांच्या त्रुटी निश्चित करून त्या कालबद्ध पद्धतीने दूर करा, अशी मागणी आदिवासी विकास आढावा समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) विवेक पंडित यांनी राज्य शासनाकडे केली आहे. शिक्षण विभागाच्या ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाचे रूपांतर आता ‘त्रुटी निर्मूलन अभियानात’ करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
शिक्षण आयुक्तालयाने ५ सप्टेंबर ते २० ऑक्टोबरदरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा परिषद शाळांच्या पाहणीचे निर्देश दिले आहेत. मात्र UDISE व शिक्षण विभागाकडे शाळानिहाय माहिती आधीच उपलब्ध असताना पुन्हा सर्वेक्षण कशासाठी, असा सवाल पंडित यांनी प्रधान सचिवांना पाठविलेल्या पत्रातून केला आहे. “शिक्षक नाहीत, वर्गखोल्या अपुऱ्या आहेत, पाणी-स्वच्छतागृह-वीज नाही, हे पुन्हा शोधण्यात वेळ घालवू नका. कोणत्या शाळेत काय कमी आहे, ते कधी पूर्ण करणार आणि त्यासाठी कोणता अधिकारी जबाबदार आहे, हे निश्चित करा,” अशी मागणी त्यांनी केली.
प्रत्येक जिल्हा परिषद शाळेची School-wise Deficiency List तयार करून प्रत्येक त्रुटीसमोर जबाबदार अधिकारी, आवश्यक निधी आणि काम पूर्ण करण्याची अंतिम तारीख नमूद करावी. दर १५ दिवसांनी बैठकींची संख्या न मोजता किती त्रुटी होत्या, किती दूर झाल्या आणि किती प्रलंबित आहेत, याचा सार्वजनिक आढावा घ्यावा, असे पंडित यांनी सुचविले आहे. पालघर हा विस्तारित आकांक्षित जिल्हा असल्याने तेथे हे अभियान ‘मॉडेल परिणामाधारित अभियान’ म्हणून राबविण्याची मागणीही त्यांनी केली. “किती शाळांना भेटी दिल्या, हा अभियानाच्या यशाचा निकष नसावा; अधिकारी गेल्यानंतर किती शाळांमध्ये प्रत्यक्ष बदल झाला, हेच शासनाने मोजावे,” असे पंडित यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *